Kolhapur Bandh | कोल्हापुरातील जनतेने शांतता राखावी, दोषींवर कारवाई करु : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

Kolhapur Bandh | कोल्हापुरातील जनतेने शांतता राखावी, दोषींवर कारवाई करु : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. जनतेने शांतता राखावी. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. (Kolhapur Bandh)

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः रस्त्यावर उतरून जमावाला नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. (Kolhapur News)

कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जमावाने दीडशेहून अधिक वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील चौकाचौकात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. (Kolhapur Bandh)

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात आज बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत. औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्ट आणि स्टेटस व्हायरल करणार्‍या समाजकंटकांना तातडीने अटक करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्‍यातच या ठिकाणी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये धक्‍काबुक्‍की झाली. यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.

हे ही वाचा :

Back to top button