

मॉस्को : जगात एक असे ठिकाण आहे जिथं ग्लासमधून पाणी हवेत फेकलं तर काही सेकंदातच त्याचा बर्फ होतो. हे ठिकाण म्हणजे रशियातील याकुत्स्क. इथं तापमान उणे 45 अंश सेल्सिअस असतं. जगातलं सर्वात थंड शहर म्हणून या शहराची ओळख आहे.
या शहरात आणि आजुबाजूच्या परिसरात जिकडे बघाल तिकडे बर्फ असतो. इतकंच काय तर माणसांच्या डोळ्याच्या पापण्याही बर्फानं माखलेल्या असतात. बाजारात गेलात तर मासे वगैरेही उघडे असूनही गोठलेले! फ्रोजन फूड द्या, असं म्हणण्याची गरजच नाही. कारण प्रत्येक गोष्ट इथली गोठलेली असते. पापण्यांवर बर्फ तर आहेच, पण पुरुषांची दाढीही त्यातून सुटलेली नाही. तुम्ही गरम केलेलं पाणी आकाशात फेकलं तर खाली येईपर्यंत त्याचा बर्फ होतो. विशेष म्हणजे या खडतर स्थितीमधील शहराची लोकसंख्या हजारात नाही तर लाखात आहे.
जवळपास तीन लाख लोकसंख्येचं हे शहर आहे. हे शहर 1632 मध्ये वसलं आणि 1643 मध्ये त्याला शहराचा दर्जा मिळाला. हे शहर रशियन प्रांत साखामध्ये वसलेलं आहे. त्याच प्रांताच्या राजधानीचं हे शहर आहे. इथं व्यापार, उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब—ुवारी असे तीन महिने कडाक्याच्या थंडीचे असतात. बर्फ एक नाही दोन नाही तर 25 फुटांपर्यंत जमा होतो. असं असतानाही कुठेही ट्रॅफिक जाम होत नाही, आपल्याकडे धुक्यात धडकतात तशा गाड्या एकमेकांवर धडकत नाहीत. सगळं काही सुरळीत सुरू असतं. याकुत्स्कचं तापमान कधी कधी उणे साठीच्या खाली घसरतं. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये इथं तापमान उणे 62 वर गेलं होतं. उन्हाळ्याच्या दिवसात ते 30 अंशांपर्यंत असतं. याकुत्स्क हे जगातल्या प्रमुख हिरे उत्पादक शहरांमध्ये मोडतं.