

ढाका/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बांगला देशातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी (दि. 18) रात्री मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने ईशनिंदेच्या आरोपावरून बेदम मारहाण करून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर जमावाने या तरुणाचा मृतदेह झाडाला बांधून पेटवून दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव दीपू चंद्र दास असे असून, तो स्थानिक गारमेंट फॅक्टरीमध्ये कामगार होता. भालुका येथील दुबालिया पाडा भागात तो भाड्याने राहत होता. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास प्रेषितांचा अवमान केल्याच्या अफवेवरून संतप्त जमावाने त्याला पकडले. जमावाने त्याला भीषण मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर क्रूरतेची सीमा गाठत हल्लेखोरांनी त्याचा मृतदेह एका झाडाला बांधला आणि सर्वांसमोर आग लावून दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. भालुका पोलिस ठाण्याचे कर्तव्य अधिकारी रिपन मिया यांनी सांगितले की, दीपूचा मृतदेह विच्छेदनासाठी मैमनसिंग मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहोत, त्यांनी तक्रार दिल्यास कडक कारवाई केली जाईल.
या भीषण घटनेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संसदेच्या परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बांगला देशातील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि अस्थिर आहे. अल्पसंख्याक, विचारवंत आणि माध्यमांवर होणारे हल्ले आता तिथे नित्याचे झाले आहेत. दुसरीकडे, बांगला देशच्या अंतरिम सरकारने या घटनेचा निषेध केला आहे. नवीन बांगला देशात अशा हिंसाचाराला जागा नाही, दोषींना सोडले जाणार नाही, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.