

Pune BJP Surendra Pathare Sayali Ramesh Wanjale News
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने पुणे महापालिका निवडणुकीची संपूर्ण धुरा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे सोपवली आहे. या निवडणुकीत १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धारच भाजपच्या नेत्यांनी केला आहे. आता हा निर्धार वास्तवात उतरविण्यासाठी प्रचार जोमात सुरू असतानाच पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला खिंडार पाडण्यास सुरुवातही झाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये राष्ट्रवादीसह ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे 'इनकमिंग' सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, अजित पवार गटाच्या सायली रमेश वांजळे, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, खंडू सतीश लोंढे, पायल विलास तुपे, प्रतिभा चोरगे, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, इंदिरा तुपे, विकास नाना दांगट, कणव वसंतराव चव्हाण, अमोल देवडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुळशी येथील पदाधिकारी भानुदास पानसरे, गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, किरण साठे, सचिन पानसरे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
"पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जनसेवेचे उत्तम कार्य केले आहे. भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. आज तुम्ही या परिवारात सामील झाला आहात. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही," अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार अत्यंत गतिमान पद्धतीने काम करत आहे. या विकासप्रक्रियेत आता तुमचाही सहभाग असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादा आणि गणेश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावी काम केले आहे. जनतेची सेवा करण्याची तुमची ही पद्धत वाखाणण्याजोगी आहे, असेही यावेळी रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले.