

India vs South Africa T20I Hardik Pandya
अहमदाबाद : शुक्रवारी (दि. १९) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून गर्लफ्रेंड महिकाला दिलेलं वचन पूर्ण केलं. मात्र हार्दिकने मारलेला चेंडू थेट तिथे असलेल्या एका कॅमेरामनला लागला.
सामना संपताच हार्दिकने त्या कॅमेरामनची विचारपूस केली आणि त्याला प्रेमाने मिठी मारली. हार्दिकने केवळ विचारपूसच केली नाही, तर त्या कॅमेरामनच्या डाव्या खांद्याला (जिथे चेंडू लागला होता) स्वतः बर्फाचा शेक दिला.
भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३० धावांनी मिळवलेल्या विजयात हार्दिक मुख्य शिल्पकार ठरला. मैदानात येताच त्याने पहिल्याच चेंडूवर कॉर्बिन बॉशला स्टेप-आउट करत मिड-ऑफ स्टँड्समध्ये षटकार ठोकला. हा षटकार थेट नरेंद्र मोदी स्टेडियमच्या डग-आउटजवळ बसलेल्या कॅमेरामनला लागला. यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला होता. प्राथमिक उपचारानंतर त्या कॅमेरामनने आपले काम पुन्हा सुरू केले.
अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हार्दिकने आपली गर्लफ्रेंड महिका शर्मा हिला 'फ्लाइंग किस' दिले. त्याने नंतर सांगितले की, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचे वचन तिला दिले होते, जे त्याने पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते आता व्हायरल होत आहे. माहिका शर्मा देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसली. हार्दिकने मैदानातून सेलिब्रेशन केले, तर माहिका स्टेडियममधून सेलिब्रेशन करत होती. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर हार्दिकने बॅट उचलली आणि सेलिब्रेशन केले. मग, महिकाकडे पाहून त्याने तिला फ्लाइंग किस दिला.
१३ व्या षटकात भारत ११५/३ अशा स्थितीत असताना हार्दिक फलंदाजीला आला. त्याने केवळ १६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. पुढे २५ चेंडूंत ६३ धावांची झंझावाती खेळी केली. तसेच, तिलक वर्मासोबत (७३ धावा) मिळून अवघ्या ४५ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करत भारताला २३१ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीतही चमक दाखवत धोकादायक ठरणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसची विकेट घेतली. हार्दिकला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली.