

Imran Khan Wife Tosha khana Case: पाकिस्तानातील एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना न्यायालयानं तगडा झटका दिला आहे. फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सी (FIA) च्या विशेष न्यायालयानं तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोघांना प्रत्येकी १७ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना दोषी ठरवून ही शिक्षा दिली आहे.
स्थानिक माध्यमांनुसार हे प्रकरण २०२१ सालंच आहे. त्यावेळी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रीन्स यांनी इम्रान खान यांना एक अत्यंत किंमती बुल्गारी ज्वेलरी सेट गिफ्ट म्हणून दिला होता. तपासात असं दिसून आलं आहे की या ज्वेलरी सेटची मूळ किंमत ही ६७ कोटी १५ लाख पाकिस्तानी रूपये इतकी होती. मात्र हा ज्वेलरी गिफ्ट सेट फक्त ५८ लाखात खरेदी करून नियमांचे उल्लंधन करण्यात आलं. न्यायालयानं सरकारचा विश्वास घात आणि भ्रष्ट आचरण असा ठपका इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्यावर ठेवला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार इम्रान खान विश्वास घात केल्या प्रकरणी १० वर्षाची आणि निवारण अधिनियम अंतर्गत ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुशरा बीबी यांना देखील अशाच प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याशिवाय दोघांनाही १ कोटी ६५ लाख पाकिस्तानी रूपये दंड देखील ठोठावण्यात आला आहे. जर दंड भरला नाही तर अतिरिक्त तुरूंगवास भोगावा लागणार आहे.
हा निर्णय अदियाला जेलमध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष कोर्टरूममध्ये विशेष न्यायाधीश शाहरूख अरजुमंद यांनी सुनावला. इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून वेगवेगळ्या तुरूंगात बंदीवास भोगत आहेत. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये अल कादीर ट्रस्ट प्रकरणात देखील इम्रान खान यांना १४ वर्षाची अन् बुशरा बीबी यांना ७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, तोशाखाना - १ प्रकरणात एप्रिल २०२४ मध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शिक्षा देण्यास बंदी घातली होती. इम्रान खानच्या लीगल टीमनं तोशाखाना - २ प्रकरणातील या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.