

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड खाडीपट्ट्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्यस्थितीला संथगतीने सुरू असले, तरी आतापर्यंत झालेल्या महामार्गाच्या कामामुळे कित्येक ठिकाणी महामार्ग सुसाट झाला आहे. या महामार्गावरून अतिशय वेगाने वाहने हाकली जात आहेत. महाड-म्हाप्रळ मार्गावर रावढळ कॉलेज दरम्यान गतिरोधक टाकून मिळावा अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांसह शिक्षकांनी केली आहे. जेणेकरून तिथून प्रवास करणाऱ्यांसह विद्यार्थ्यांना वेगवान धावणाऱ्या वाहनांपासून धोका पोहोचणार नाही.
सावित्री पूल उद्घाटन प्रसंगी 2017 साली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या राजेवाडी फाटा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे या महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करून दोन पदरी महामार्गाचे त्यावेळी भूमिपूजन करण्यात आले.
हे काम 2017 पासून सुरू झालेले हे काम 2019 साली पूर्ण होणार होते, मात्र आजतागायत हे काम पूर्णत्वाला गेलेले नाही. अजून किती वर्षे हे काम सुरू राहील याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे झालेल्या सुसाट महामार्गावरून वेगवान धावणाऱ्या वाहनांना लगाम लागण्यासाठी ठीकठिकाणी गतिरोधकाची मागणी होत आहे.
महाड-म्हाप्रळ दरम्यान महाड शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या रावढळ ज्युनिअर कॉलेज येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचा याच महामार्गावरून प्रवास होत असून महामार्ग ओलांडून वाहन पकडावे लागत आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांना वेग मर्यादित राहावी याकरिता गतिरोधकाची मागणी होत आहे.
संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन आणि महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल आणि तोपर्यंत या ठिकाणी वेगवान धावणाऱ्या वाहनांना त्यांची गती रोखण्यासाठी ठिकठिकाणी गतिरोधक बसवणे गरजेचे असल्याने मागणी होत आहे.
महाड-म्हाप्रळ मार्गावरील शिरगाव फाटा ते ओवळेपर्यंतच्या महामार्गाचे काम डांबरीकरण करण्यात आले असून ओवळे ते पुढे थेट आंबडवे पर्यंत काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी अजूनही काम प्रलंबित आहे. मोऱ्यांसह पुलाचे काम तसेच तेलंगे मोहल्ला येथील रस्त्याचे काम बाकी आहे, मात्र ज्या-ज्या ठिकाणी हया महामार्गावरील काम पूर्ण झाले आहे आणि हा दोन पदरी महामार्ग असल्यामुळे या महामार्गावरून वाहने वेगवान गतीने धावत आहेत. रावढळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी एकूण 250 च्या आसपास विद्यार्थी संख्या असून हायस्कूल कॉलेज प्रवेशद्वाराच्या जवळूनच महामार्ग जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून त्यामुळे तात्काळ या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तरी गतिरोधक टाकावा अशी मागणी तेथील स्थानिकांकडून होत आहे.