

Ishan Kishan T20 World Cup 2026: भारतीय वरिष्ठ संघाचे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज (दि. २० डिसेंबर) भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकपसाठी १५ सदस्यांच्या संघाची घोषणा केली. या संघनिवडीवेळी निवडसमितीनं अनेक मोठे धक्के दिले. ज्याला पुढचा टी २० संघाचा कर्णधार म्हटलं गेलं होतं त्या शुभमन गिलचाच पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालचा देखली संघात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे इशान किशनची ऐनवेळी संघात वर्णी लागली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेत इशान किशन नव्हता. तसेच तो अनेक महिन्यांपासून टीम इंडियात खेळलेला नाही. तरी देखील इशान किशनची संघात वर्णी कशी लागली अशी चर्चा सुरू झाली आहे. संघात संजू सॅमसन हा एक विकेटकिपर असून इशान किशनला दुसरा विकेट किपर म्हणून घेण्यात आलं आहे.
दरम्यान, इशान किशन यांची टी २० वर्ल्डकप संघात अचानक निवड होण्यामागं एक मोठे कारण म्हणजे नुकतेच झारखंडने सईद मुश्ताक अली ट्रॉफी ही भारतातील प्रतिष्ठित टी २० स्पर्धा जिंकली. याच विजेत्या संघाचा कर्णधार हा इशान किशन होता. त्याचेच बक्षीस त्याला बरोबर दोन दिवसांनी आज संघ निवडीच्या स्वरूपात मिळालं आहे. विशेष म्हणजे इशानने सईद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये ४९ चेंडूत शतकी तडाखा दिला होता.
त्याने संघातून वगळल्यानंतर सातत्यानं देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली होती. दरम्यान, कधी काळी आक्रमक फलंदाजी अन् विकेटकिपिंगच्या जोरावर इशान किशनने आपली टीम इंडियातील जागा पक्की केली होती.
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर तर इशान किशनच तीनही फॉरमॅटचा विकेट किपर होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याच्यावर निवडसमितीनं शिस्तभंगाची कारवाई करत त्याला संघातून डच्चू दिला. एवढंच नाही तर त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून देखील वगळण्यात आलं होतं.
त्यात त्याची जागा घेणाऱ्या इतर खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पंतही संघात परतला. त्यानंतर इशान किशन आता कधी टीम इंडियात दिसणार नाही अशी चर्चा देखील सुरू झाली. मात्र म्हणतात ना... सर्व गोष्टींवर काळ हेच उत्तर असतं.
संघातून वगळलं
करारही हातून निसटला.
किशन असा किशन तसा... अनेक चर्चांना उधाण
देशांतर्गतमध्ये पुनरागमन
क्रिकेट एन्जॉय केलं. मजा म्हणून धावा केल्या.
झारखंडला SMAT जिंकून दिली.
इशान किशननं सगळे वाद पाठीमागं टाकत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं. तो संघ निवडीबाबत विचारच करत नव्हता. तो फक्त आपलं क्रिकेट एन्जॉय करत होता. त्यानं आपला फॉर्म परत मिळवला. त्याची कामगिरी टीम इंडियाचे सतत दार ठोठावत होती. मात्र प्रत्येक वेळी त्याच्या पदरी निराशा पडत होती.
इशान किशन मात्र निराश झाला नाही. त्यानं आपलं काम करणं सोडलं नाही. तो बॅटनं धावा करत गेला. अखेर झारखंडला त्यांचे पहिले सईद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद जिंकून देत त्यानं निवडसमितीला आपली दखल घ्यायला लावलीच.