

निफाड (नाशिक): दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'स्वावलंबी नाशिक' उपक्रमाला निफाडमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. वैनतेय महाविद्यालयामध्ये आयोजित शिबिरात तालुक्यातील शेकडो दिव्यांगांनी उपस्थिती राहून आरोग्य तपासणी करत यूडीआयडी कार्डसाठी नोंदणी केली. शिबिरात तालुक्यातील ७३५ दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला होता.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आणि गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. पंचायत समितीतर्फे करण्यात आलेल्या नियोजनामुळे दिव्यांग बांधवांची गैरसोय झाली नाही. शिबिरात यूडीआयडी कार्डसाठी ऑनलाइन नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
आरोग्य विभागामार्फत केस पेपर, प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात मतिमंद, मानसिक आरोग्य, कान-नाक-घसा, नेत्ररोग, अस्थिरोग व बहुविकलांग विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून दिव्यांगांची तपासणी केली. शिबिरात तालुक्यातील ७३५ दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ५९५ जणांचे नवीन पेपर काढण्यात आले. ज्यांना उपचारांची किंवा विशेष प्रमाणपत्रासाठी तांत्रिक तपासणीची गरज आहे, अशा ४५९ दिव्यांगांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. विशेष म्हणजे, लांबून आलेल्या दिव्यांगांना चहा व नाश्त्याची व्यवस्था केली होती. ज्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिरासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडीसेविका आणि जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य मिळाले. हेमंत सोनार यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांच्या शासकीय कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.