

Doctor Dies Accident in Shiroli
नागाव : पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दर्ग्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण डॉक्टर जागीच ठार झाला. आईच्या डोळ्यावर औषधोपचार करण्यासाठी त्याला गावाकडे बोलावून घेतले होते. पण माय लेकरांच्या भेटी आधीच नियतीने मुलास हिरावून नेले. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने आईसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हा अपघात शनिवारी (दि.२०) सकाळी ९ च्या सुमारास घडला.
मृत तरूणाचे नाव डॉ. प्रसाद दिनकर बुगडे (वय २९, रा. मलिग्रे, ता. आजरा, जि कोल्हापूर) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. प्रसाद आज सकाळी मिरजहून मलिग्रेकडे जात असताना त्याच्या दुचाकीला ( एम एच ०९ जी व्ही ८०५९ ) ला पंचगंगा नदी येथील पीर दर्ग्याजवळ अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला.
प्रसाद याला तीन बहिणी असून त्याच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रसाद हा अभ्यासात हुशार होता. त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गावातच झाले तर १२ वीचे शिक्षण गडहिंग्लज तर वैद्यकीय शिक्षण कवठेमहांकाळ येथे झाले. होते. तो आपल्या डॉक्टर बहिणीकडे मिरज येथे राहत होता.
प्रसाद याच्या आईच्या डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्याने आईला गावावरून फोन करून तावडे हॉटेल येथे येण्यास सांगितले होते. तेथून ते दोघे मोटरसायकलवरून कणेरीमठ येथे उपचारासाठी जाणार होते. परंतु, पीर दर्गा ते तावडे हॉटेल केवळ एक किलोमीटरचे अंतर राहिले असतानाच आईच्या भेटी विनाच प्रसादचा अपघाती मृत्यू झाला . प्रसाद हा कुटुंबात सर्वात लहान असला तरी त्याच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती.