

बीजिंग : चीनच्या ‘नोएटिक्स’ या कंपनीने ‘हॉब्स डब्लू 1’ नावाचा एक प्रगत ह्युमनॉईड (मानवी रूप असलेला) रोबो लाँच केला आहे. हा रोबो विशेषतः सेवा क्षेत्रातील कामांसाठी विकसित करण्यात आला असून, तो भावना समजू शकतो आणि लोकांशी संवादही साधू शकतो.
या रोबोचा चेहरा ‘बायोनिक’ तंत्रज्ञानाने बनवला असून त्यावर मानवी त्वचेसारखी दिसणारी त्वचा बसवण्यात आली आहे. ‘हॉब्स डब्लू 1’चे हात ‘सिक्स डिग्री ऑफ फ्रीडम’ सह बनवले आहेत, म्हणजेच ते सर्व दिशांना फिरू शकतात. यामुळे हा रोबो वस्तू पकडणे, इशारा करणे किंवा छोटी-मोठी कामे सहज करू शकतो. हा रोबो पाहुण्यांचे स्वागत करू शकतो आणि त्यांना रस्ता दाखवू शकतो. यावर एक मोठी स्क्रीन देखील आहे, ज्याद्वारे तो आपल्या भावना व्यक्त करतो. हा रोबो हॉटेल, दुकाने, शाळा आणि कार्यालयांमध्ये ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून उत्तम काम करू शकतो.
तो स्वतःहून खोल्यांचे नकाशे तयार करू शकतो आणि कोणाच्याही मदतीशिवाय अडथळ्यांमधून वाट काढत फिरू शकतो. कंपनीच्या मते, हा रोबो माणसांची जागा घेणार नसून केवळ त्यांच्या कामात मदत करेल. नोएटिक्स कंपनीने यापूर्वी ‘बूमी’ नावाचा लहान मुलाच्या आकाराचा स्वस्त रोबो लाँच केला होता. ह्युमनॉईड रोबोंच्या किमती लाखो रुपयांमध्ये असतात, मात्र नोएटिक्सने स्वतःचे पार्टस् आणि वजनाने हलके साहित्य वापरून या किमती कमी केल्या आहेत. या कंपनीला नुकताच 41 दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळाला असून, त्याद्वारे त्यांना ह्युमनॉईड रोबो प्रत्येक घराघरांत पोहोचवायचे आहेत.