सेक्युलरच हिंदुत्वासाठी घातक : स्वाती खाड्ये | पुढारी

सेक्युलरच हिंदुत्वासाठी घातक : स्वाती खाड्ये

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा :  130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये 100 कोटी हिंदू असूनही ते संघटित नसल्याने त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून सेक्युलरच्या नावाखाली सुरू असलेला प्रकारच हिंदुत्वासाठी घातक असल्याचे प्रतिपादन स्वाती खाड्ये यांनी केले. गडहिंग्लजमध्ये म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित केलेल्या हिंदू सभेमध्ये त्या बोलत होत्या.

प्रारंभी शंखनादाने दीपप्रज्वलन करण्यात आले. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर वेदमूर्ती ऋषिकेश कापशीकर-जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. आढावा आदित्य शास्त्री यांनी घेतला. यावेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी देशातील हिंदू मंदिराचे खासगीकरण केले जाते, मात्र अन्य धर्मीयांना सूट दिली जाते. संघटित नसल्याचाच हा तोटा असून सर्व मंदिरे खुली होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

मनोज खाड्ये यांनी हिंदूच्या श्रद्धास्थानावर संधी मिळेल त्यावेळी बोलले जाते. आपण मात्र गप्प बसत असून केवळ राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जातो. व्यवस्था बदलूनच हिंदू राष्ट्र करण्याची आवश्यकता असून सध्या सुरू असलेली धर्मांतरे रोखण्यासाठी लढा सुरूच राहणार असून त्यासाठी संघटित होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

Back to top button