Kolhapur Political News | भाकरी परता नाही तर तवा करपल! भुदरगड तालुका संघाची निवडणूक चिठ्ठ्यांमुळे चर्चेत; आबिटकर, के. पी. पाटलांना कोपरखळ्या | पुढारी

Kolhapur Political News | भाकरी परता नाही तर तवा करपल! भुदरगड तालुका संघाची निवडणूक चिठ्ठ्यांमुळे चर्चेत; आबिटकर, के. पी. पाटलांना कोपरखळ्या

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील : भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत दुरंगी लढतीत सत्ताधारी गटाने बाजी मारली. महायुतीच्या माध्यमातून लढली गेलेली ही तालुका संघाची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आली. त्यामध्ये मतदारांनी बिद्री साखर कारखाना, आमदारकी, पै पाहुण्यांचे राजकारण करा, कार्यकर्ता कोण ओळखा, अशा नानाविध चिठ्ठ्यांच्या माध्यमातून आपल्या नेत्यांना कोपरखळ्या मारण्याचं काम कार्यकर्त्यांनी केले. या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या चिठ्ठ्या मतपेटीमध्ये आल्या होत्या. त्यापैकी काही मोजक्या चिठ्ठ्यांमधील मजकुराची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. (Kolhapur Political News)

‘आम्ही सगळे भाऊ-भाऊ सगळेजण वाटून खाऊ, अशीच राहू दे बिद्रीत महायुती पण सामान्य घरातील उमेदवार प्रतिनिधी असावा. नेत्यांचा खास नसावा. दूध संघ, मार्केट कमिटी, तालुका संघ एकत्र लढवणाऱ्या नेत्यांनो बिद्री मिटवा व आमदारकी विधानसभा अडीच-अडीच वर्षे वाटून घ्या. मुदाळ गावचे नेते जिल्ह्याचे महाराष्ट्राचे देशाचे राजकारणी आहेत. पण त्यांना मुदाळचे राजकारण अजूनही समजलेले नाही. या मताचा मी एक मतदार आहे.

के. पी पाटील यांनी केडीसी बँकेची सत्ता अनेक वर्षे भोगली व कारखान्याचे चेअरमन व संचालक अनेक वर्षे राहिले. मुद्दाळ तिट्टा येथे सर्व कारखान्यांचे सेंटर ऑफिस आहेत. पण बिद्रीचे सेंटर ऑफिस व केडीसी बँकेची शाखा त्यांना मंजूर करता आली नाही हे त्यांचे स्वार्थाचे राजकारण आहे. ज्यांनी संघ दिवाळखोरीत काढला त्यांच्या वारसांना उमेदवारी देऊन संघ वाचवणार काय ही चूक केली. महाविकास आघाडीने अशी चूक करू नये.’

‘आमदार आबिटकर साहेब नमस्कार आपण दोन वेळा आमदार झाला. आता हॅट्‌ट्रिक करावी, ही आमची इच्छा आहे. पण एक निष्ठावंत म्हणून आमची खंत आहे 2009 साली तुम्ही आमदार व्हावं म्हणून आम्ही जिवाचं रान केलं. एक वोट एक नोट या तत्त्वावर आम्ही राहिलो. त्यावेळी मोजकी माणसे होती. लोकांनी आमची निंदा केली. पण आम्ही खचलो नाही. तुमच्यासाठी राबलो, खपलो आणि 2014 ला आमचं स्वप्न पूर्ण झालं. आता तुम्ही लोकप्रिय आमदार झाला. प्रेम दाखवणाऱ्या स्वार्थी लोकांच्या गर्दीत हरवला. 2009 ला तुम्हाला शिव्या घालणारे तुमच्या भोवती गोंडा घोळत आहेत, तुम्ही दोघे भाऊ त्यांना रसद पुरवत आहात. तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला मदत करीत राहील. त्या काळात हे स्वार्थी, ढोंगी लोकं कुठे होते आणि आता सुरुवातीपासून तुम्हाला ताकद देणाऱ्या निष्ठा ठेवणाऱ्यांचं काय.

तुमच्याकडून अपेक्षा होती ती तुम्ही व्यर्थ ठरवली. स्वार्थासाठी तुम्ही एकत्र आलात पण कारखाना आणि आमदारकीच पुढे काय होणार ते ठरवा.’

के. पी. साहेब बिद्री कारखाना बिनविरोध करा तुम्ही चेअरमन व्हा. कारखाना चांगला चालवलाय. पण तुमच्या पै- पाहुण्यांचे संचालक करू नका. सामान्य एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी द्या. कारखाना मिटो अगर लागो ज्याने दहा वर्षे संचालक पद भूषवले त्यांना पुन्हा संधी देऊ नका. भाकरी परता नाही तर तवा करपल.

के. पी. साहेब तुम्ही आमदारकी लढा व प्रकाश आबिटकर यांना खासदार करा व कागल तालुक्याची मक्तेदारी मोडा. भुदरगडचे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवा.

बिद्री कारखाना बिनविरोध झाला की संजय मंडलिक पुन्हा खासदार होणार हे स्वप्न असेल तर स्वप्न पूर्ण होणार नाही. आम्ही बिद्री कारखाना स्वबळावर लढवणारच. कारण लोकांना 50 खोके नको आहेत.

तुम्ही मांडीला मांडी लावून बसा आणि कट्टर कार्यकर्त्यांना डोकी फोडायला लावा याला म्हणतात सोयीच राजकारण. सोयीचे राजकारण बंद करा, बिद्री कारखाना बिनविरोध करा अशा अभद्र युतीचा धिक्कार असो. के. पी. पाटील साहेब व आमदार प्रकाश आबिटकर साहेब तुम्ही स्वार्थापोटी राजकारण करा आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडा. पण आता कारखाना पण दोघांनी मिळून बिनविरोध करून घ्या. कारण कारखान्यावरती उगीच खर्च नको. तसेच भुदरगड तालुका संघाचे इलेक्शन झाले त्यामुळे त्या संघावरती जो बोजा पडला आहे. त्यामुळे संघ दोन वर्षे मागे पडला आहे. आता इथून पुढे जे संचालक म्हणून निवडून येतील. त्यांना पण सांगा की जे सभासद आहेत त्यांच्याकडून एक हजार रुपये गोळा करून संघावरचा बोजा कमी करा.

दूध संघ, मार्केट कमिटी, तालुका संघ एकत्र लढणाऱ्या नेत्यांनो बिद्री मिटवा आमदारकी अडीच अडीच वर्षे वाटून घ्या.’

अशा आशयाच्या मजकुराचा समावेश असणाऱ्या चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्यांची खुमासदार चर्चा राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे. निवडणूक भुदरगड तालुका संघाची पण चिठ्ठ्यांच्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर चर्चा होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा  :

Back to top button