

मोखाडा : पालघर जिल्ह्यात सरकारी योजना केवळ शासकीय आदेश म्हणून न पाळता या योजनांचा शाश्वत उपयोग व्हावा या उद्देशातून पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वनराई बंधारे बांधण्यावर अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्यांनी सर्व विभाग प्रमुख बचत गट अशा सरकारी आस्थापनेतील प्रत्येक घटकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील केले आहे.
याच पार्श्वभूमीवर मोखाडा तालुक्याचे गटविकास अधिकारी अक्षय पगारे यांनी नुकताच कारेगाव ग्रामपंचायत मध्ये एका वनराई बंधाऱ्याच्या बांधकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी पगारे यांनी थेट खोदकाम गोण्यांमध्ये माती भरणे पाठी भरून माती बंधाऱ्याच्या भरावासाठी अशी सर्व कामे करीत थेट या बंधाऱ्यासाठी असलेल्या मजुरांमध्ये सामील होऊन हे काम पार पडल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
केवळ फोटो आणि व्हिडिओ पुरते हे काम नव्हते तर वनराई बंधारा बांधण्याची सुरुवात ते पूर्ण बंधारा बांधून होईपर्यंत या सगळ्या कामांमध्ये मोखाडा गटविकास अधिकारी सक्रिय दिसून आल्याने वनराई बंधाऱ्यांचा जो फायदा जिल्ह्यात होणार आहे. त्यासाठी केवळ ग्रामसेवक सरपंच ग्रामस्थ विद्यार्थीच नव्हे तर थेट क्लास वन अधिकारी सुद्धा अशा प्रकारे योजनांमध्ये सामील होणे हे अतिशय आशादायी चित्र असल्याचे आता दिसून येत आहे.
वनराई बंधारे उभारणी ही केवळ औपचारिक बाब न राहता जलसाठा निर्माण करणारी वास्तव व उपयोगी ठरणारी असावी या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीटंचाई वर मात करता येईल व शाश्वत जलसंधारण साध्य होईल यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखांनी पुढाकार घ्यावा तसेच अधिकारी कर्मचारी महिला बचत गट यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा असे आवाहन सीईओ रानडे यांनी केले होते याला आता थेट अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
मोखाडा तालुक्यात बंधाऱ्यांचे काम सुरू
मोखाडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्याचे काम चालू आहे यासाठी सर्व ग्रामसेवक मंडळी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावाच्या नजीक असलेल्या पाण्याच्या श्रोतावर हे बंधारे बांधताना दिसून येतात. नुकतेच कारेगाव ग्रामपंचायत मध्ये सुद्धा दुसरा वनराई बंधारा बांधण्यात आला. यासाठी थेट गटविकास अधिकाऱ्यांनी दिवसभर थांबून आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा वनराई बंधारा बांधल्याचे दिसून आले.
यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील पाटील सरपंच मुरलीधर कडू, उपसरपंच मिलिंद बदादे सरपंच सदस्य हनुमंत फसाळे देविदास ठोमरे, ग्रामपंचायत अधिकारी एस आर धुरंधर, कृषी सहाय्यक मिटकरी, नरेगा विभागाच्या स्वप्नाली दोंदे, शुभम मोरे, अविरत दोंदे, विजय ठोमरे गोपाळ ठोमरे, हरी ठोमरे कारेगाव ग्रामस्थ आदि उपस्थित होते.