

बापू जाधव
निमोणे: समाजाच्या ज्या मंडळींकडून मोठ्या अपेक्षा असतात त्याच मंडळींचा यकृत निकामी होऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे गावोगावी पहायला मिळतात. यातून व्यसनाधीनतेतून संबंधित कुटुंबासह समाजाचेही मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट होते. असे असले तरी त्याच गावांत अद्यापही व्यसनांच्या आहारी गेलेले, यकृत निकामी झालेले अनेक रुग्ण पहायला मिळतात.
कुणी एखाद्या गावचा सरपंच, कुणी सहकार संस्थेचा पदाधिकारी, शासकीय नोकरदार, तर कुणी व्यावसायिक, अशा समाजातील सन्माननीय मंडळींचा ऐन तारुण्यातच यकृताच्या आजाराने मृत्यू झाला आहे. गेल्या एक दशकापासून ग््राामीण भागावर मोठ्या प्रमाणात शहरांचा प्रभाव वाढला आहे.
शहरात मिळणारी नशेचे पदार्थ खेडोपाडी आता सहज उपलब्ध होत आहेत. या नशेच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबाला अवकळा आली आहे. त्यातून रुग्णालयाच्या खर्चाने कुटुंबाची आर्थिक हेळसांड सुरू झाली. एकुलता एक मुलगा व्यसनाधीनतेतून मृत्यू झाल्याने वयोवृद्ध आई-वडिलांचा आधार हरपला. तर अनेक लहान मुलांनी आपल्या वडिलांना गमावले आहे. अशा अनेक विदारक कथा गावोगावी दिसून येतात.
दुसरीकडे कोणतेही व्यसन नसलेल्या काही जणांनाही यकृतासंबंधित आजार जडले आहेत. त्याला बदललेली जीवनशैली, आहार तसेच पालेभाज्यांसाठी वापरण्यात येणारे जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर आदी कारणे असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
व्यसन हे यकृतासंबंधी आजारांचे मूळ कारण आहे. त्याचबरोबर बी व सी प्रकारची कावीळ, यकृतावर चरबी जमा होणे यामुळेही लिव्हर सायरोसिस होऊ शकतो. अलिकडे असे काही रुग्ण येतात जे पूर्णपणे व्यसनाच्या विरोधात असतात. मात्र, त्यांनाही तीच समस्या असते. त्याला आपला आहार कारणीभूत ठरतो. आपण बहुतांशी वेळा प्रक्रिया केलेले अन्न खातो. बैठे काम, व्यायामाचा अभाव, ब्लडप्रेशर, शुगर किंवा अति प्रमाणात स्निग्ध पदार्थांचा समावेशामुळे यकृतावर चरबी वाढते.
डॉ. दिनकर सरोदे, वैद्यकीय अधिकारी, न्हावरे, ग््राामीण रुग्णालय