

पालघर : हनिफ शेख
राज्यात 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या मतमोजणीची प्रक्रिया काही ठिकाणच्या निवडणुकीमुळे पुढे गेली होती. यामुळे अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून पालघर जिल्ह्यातील जव्हार डहाणू पालघर नगरपरिषद आणि वाडा येथील नगरपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार असल्याने कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
काही उमेदवारांनी मतदान आणि मतमोजणी यामधील वाढलेले अंतर पाहता फिरून येणे पसंद केले तर काहींनी आराम केल्याचे दिसून आले. मात्र या मोठ्या कालावधीमध्ये उमेदवार निवांत झाल्याचे देखील दिसून येत होते मात्र आता एका दिवसावर मतमोजणी आल्याने पुन्हा उमेदवारांचा तणाव वाढल्याचे देखील एकूणच चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील पालघर नगर परिषदेमध्ये 29 जागांसाठी तब्बल 112 उमेदवार रिंगणात होते तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण 27 जागांसाठी 65 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये थेट लढत झाली होती. तर जव्हार नगर परिषदेतील 20 जागांसाठी तब्बल 69 उमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते याचबरोबर वाडा नगरपंचायतच्या 17 जागांसाठी तब्बल 67 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. या सगळ्यांचे भवितव्य दोन डिसेंबर रोजीच मतपेटीत बंद झाले होते. यावेळी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी लागलीच मतमोजणी होती मात्र काही जागांची निवडणूक होणे बाकी असल्याने कोर्टाच्या निर्णयानुसार ही मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे जाहीर झाले होते.
यासाठी पालघरमध्ये एक आणि वाडा या ठिकाणी एक अशा दोन नगरसेवक पदासाठी च्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. आणि या सर्वांची एकत्रितपणे मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे. खरंतर मतदान आणि मतमोजणी यामधील दिवसात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. तर अनेक राजकीय जाणकार कोण जिंकेल कोण हरेल याबाबतचा कयास बांधताना दिसून आले.
चौका चौकात, चावडीवर, पायऱ्यांवर आणि घराघरात सुद्धा या चारही जागांवरील निवडणुकांची चर्चा एवढ्या दिवसात रंगल्याचे दिसून आले तर आम्ही जिंकणार हा दावा देखील सर्वच नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून या दिवसात होताना दिसला. मात्र आता या सर्व चर्चांना फुलस्टॉप मिळणार असून उद्या या चारही जागांची मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू होऊन अगदी काही तासातच संपणार असल्याने जिल्ह्यात कोणता पक्ष भारी आणि कोण उमेदवार कारभारी हे समोर येणार आहे.