

काटेवाडी: यंदाच्या लग्नसराईचा हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होताच ‘डेस्टिनेशन वेडिंग’ आणि ‘प्री-वेडिंग फोटोशूट’साठी बारामती तालुक्याला विशेष पसंती मिळू लागली आहे. येथील ऐतिहासिक वारसा, पुरातन मंदिरे, नद्यांचे संगम, हिरवळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांचे अनोखे संमिश्रण असलेल्या बारामतीला शेजारील तालुके आणि जिल्ह्यांतील विवाहेच्छुक मंडळींकडून पसंती मिळत आहे. परिणामी, बारामती नव्याने वेडिंग हबच्या नकाशावर ठळक होत आहे.
निरा व कऱ्हा नद्या तसेच निरा डावा कालवा तालुक्यातून प्रवाहित असल्याने परिसराला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे. कऱ्हा-निरा नदीच्या संगमावर वसलेले पुरातन सोनेश्वराचे मंदिर श्रद्धा आणि स्थापत्यकलेचा ठसा उमटवते, तर कन्हेरी येथील हनुमान मंदिर आणि परिसरातील हिरव्यागार टेकड्या छायाचित्रणासाठी आकर्षण ठरत आहेत. येथे सकाळची कोवळी धुंदी, संध्याकाळचा सोनेरी प्रकाश आणि नद्यांच्या काठावरील शांतता प्री-फोटोशूटला वेगळीच झळाळी देत आहे. यासह भिगवण रोड परिसरातील शैक्षणिक संकुले, विमानतळ परिसर, तालुक्यातील इतरही अनेक स्थळे सध्या वेडिंग डेस्टिनेशन म्हणून पुढे येत आहेत.
कन्हेरी-काटेवाडी परिसरात साकारत असलेले वन-उद्यान व शिवसृष्टी, खासदार सुनेत्रा पवार यांचे काटेवाडी गाव, फार्म हाऊस आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, यामुळे बारामतीला विविध थीम्ससाठी लोकेशन्स उपलब्ध होत आहेत. ग््राामीण निसर्ग, धार्मिक पार्श्वभूमी, आधुनिक वास्तू आणि प्रशस्त रस्ते, यांचे मिश्रण येथे पाहायला मिळते. पालखी महामार्गामुळे प्रवेश सुलभता आणि वैविध्यपूर्ण लोकेशन्स उपलब्ध होत आहेत. ग््राामीण-नैसर्गिक पार्श्वभूमीपासून ते आधुनिक वास्तूंमधील भव्यतेपर्यंत सर्वप्रकारच्या थीम्ससाठी येथे पर्याय मिळतो. त्यामुळे विवाहेच्छुक जोडप्यांची पावले बारामतीकडे वळताना दिसत आहे.
बारामतीत स्थानिक लॉन्स, मंगल कार्यालये, रिसॉट्र्स, केटरिंग, सजावट, फोटोग््रााफी आदी सेवासाखळीही सहज उपलब्ध होते. त्यामुळे प्री-वेडिंग शूटसह डेस्टिनेशन वेडिंगचे एकत्रित पॅकेज लोकप्रिय ठरत आहेत. पर्यटकांसह विवाह सोहळ्यांसाठी येणाऱ्या पाहुण्यांमुळे स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळत असून, रोजगाराच्या संधी वाढताना दिसत आहे.
एकूणच, निसर्गसौंदर्यासह धार्मिक वारसा, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी यांची सांगड घालणारी बारामती आज डेस्टिनेशन वेडिंगसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. त्यामुळेच प्री-फोटोशूटपासून भव्य विवाह सोहळ्यांपर्यंत बारामतीची ख्याती राज्यभर पसरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.