

नाशिक : समाजातील महिलांवर, विशेषतः पतीच्या निधनानंतर लादल्या जाणाऱ्या अमानवी, अवैज्ञानिक व अन्यायकारक प्रथा नाकारत स्त्रीसन्मान, समानता व मानवी हक्कांचे मूल्य अधोरेखित करणारा सौभाग्याचं शपथपत्र हा अभिनव उपक्रम जिल्हा परिषद नाशिकच्या नवचेतना अभियानल अंतर्गत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शपथपत्रात पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सौभाग्याचे शपथपत्र या अभिनव उपक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील गुळवंच ग्रामपंचायतीने जनजागृती केली. यात ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी पुढाकार घेत, येथील माध्यमिक विद्यालय गुळवंच येथील २६७ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून सौभाग्याचं शपथपत्र भरून घेत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. भरून घेतलेले शपथपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपर्द केले. जनजागृतीची ही चळवळ घराघरापर्यंत पोहचवा.
अशा प्रकाराचे शपथपत्र सर्व सभासदांनी शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून भरून घ्यावे असे पवार यांनी सांगितले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, डॉ. वर्षा फडोळ, राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ठाकरे उपस्थित होते. सदर या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच भाऊदास शिरसाठ, मुख्याध्यापक काळे व संजय गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
"महिलांच्या आत्मसन्मानाला बाधा आणणाऱ्या कुप्रथांना नकार देणे ही काळाची गरज आहे, सौभाग्याचे शपथपत्र उपक्रमातून समाजात स्त्री पुरुष समानतेची जाणीव निर्माण होत असून हा बदल प्रत्येक कुटुंबातून स्वेच्छेने व्हायला हवा."
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
नाशिक तालुक्यातील चांदशी ग्रामपंचायत अंतर्गत विविध धर्मीय २० पती-पत्नींनी स्वेच्छेने सहभाग घेत सौभाग्याचं शपथपत्र स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. शपथपत्राद्वारे सहभागी दांपत्यांनी महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याची, महिलेला दुय्यम ठरवणाऱ्या कुप्रथांना कोणतेही समर्थन न देण्याची तसेच कुटुंब, गाव व समाजपातळीवर जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारली. हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष आचरणात व कृतीत उतरविण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी विनोद अहिरे व त्यांची पत्नी राजश्री अहिरे यांनी पवार यांची भेट घेऊन अभिनव उपक्रमाची माहिती दिली. याबद्दल पवार यांनी अहिरे दाम्पत्याचे अभिनंदन केले.