Rana Daggubati : भल्लालदेव संतापला! विमानातून सामान गायब, एअरलाईननं मागितली माफी | पुढारी

Rana Daggubati : भल्लालदेव संतापला! विमानातून सामान गायब, एअरलाईननं मागितली माफी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाहुबली फेम अभिनेते राणा दग्गुबाती (Rana Daggubati) ने इंडिगो एअरलाईनच्या व्यवस्थेवरून ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने ट्विट करत म्हटलं आहे की, इंडिगो एअरलाईनमध्ये बेजबाबदारपणा दिसून येतोय. त्याने आरोप केला आहे की, या एअरलाईनमध्ये फ्लाईटमध्ये लगेज (साहित्य) हरवते आणि स्टाफला देखील याची कोणतीही माहिती नाही. असे म्हणत त्याने रविवारी इंडिगोवर तीव्र संताप व्यक्त केला.

आतापर्यंत सर्वात एअरलाईनचा असा अनुभव आल्याचे राणाने सांगितले. टॉलीवूड अभिनेता राणाने ट्विटरवर आपला राग व्यक्त करत म्हटलं की, “भारताचा आतापर्यंतच्या सर्वांत वाईट एअरलाईनचा अनुभव एट-इंडिगो ६ ई. फ्लाईटच्या वेळा ठिक नाहीत…हरवलेल्या सामानाचं काय झालं कळालं नाही…स्टाफलादेखील कुठलीही माहिती नाही? ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणाला हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला. त्यानंतर तो आपल्या फॅमिलीसोबत बंगळूरसाठी रवाना झाला.

इंडिगो एअरलाईनने मागितली माफी

दग्गुबती आणि अन्य लोकांना चेक-इन केल्यानंतर, त्यांना सूचना करण्यात आली की, काही तांत्रिक समस्यामुळे विमान उड्डाण होण्यास विलंब झाला. दुसरे विमानात जाण्यासाठी सांगितले तसेच राणाचे सामान त्याच विमानाने पाठवले जाईल, असे सांगितले. बंगळूर विमानतळावर उतरल्यानंतर अभिनेता राणाला आपल्या साहित्याचे काय झाले याची माहिती मिळाली नाही. त्याने एअरलाईन कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनाही माहिती नसल्याचे समजले.

यानंतर राणाने एअरलाईनच्या एका प्रमोशनल ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘होऊ शकतं की, इंजिनियर्स चांगले आहेत, पण स्टाफ तर क्लूलेस आहे. तुम्हाला सर्वकाही प्रॉपर पद्धतीने करण्याची गरज आहे.’ इंडिगो एअरलाईनने राणा दग्गुबातीला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे.

इंडिगोने लिहिलं, “असुविधांसाठी आम्ही क्षमा मागतो. कृपया निश्चिंत राहा. आमची टीम आपले सामान लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.”

Back to top button