IFFI : इंडियन पॅनोरमा विभागात 25 फिचर, 20 नॉन फिचर; ‘आत्तम’ चित्रपटाने सादरीकरणास सुरुवात | पुढारी

IFFI : इंडियन पॅनोरमा विभागात 25 फिचर, 20 नॉन फिचर; ‘आत्तम’ चित्रपटाने सादरीकरणास सुरुवात

पणजी; योगेश दिंडे : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात सादर होणारे 25 फिचर आणि 20 नॉन-फिचर चित्रपट प्रेक्षकांसाठी सर्वोत्कृष्ट अनुभव देणारे ठरणार आहेत. ‘आत्तम’ या मल्याळी चित्रपटाच्या प्रदर्शनासह मंगळवारी (दि.21) इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांच्या सादरीकरणाला सुरुवात होईल.

विविधतेतील एकता आणि समावेशकता यांच्या सर्वत्र व्यापणार्‍या संकल्पनांवर बेतलेले आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील संस्कृती, दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्वे आणि कथा यांच्या विस्तृत श्रेणीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपट विभागात सादर होणारा आणि आनंद एकरसाही यांनी दिग्दर्शित केलेला हा उद्घाटनपर चित्रपट, आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवण्याची संधी मिळालेली ‘एक स्त्री आणि बारा पुरुष’ यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘अँड्रो ड्रीम्स’ हा मीना लोंगीयाम दिग्दर्शित चित्रपट नॉन-फिचर विभागात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. मणिपुरमधील ग्रामीण भागातील एका गावात चित्रित केलेला हा माहितीपट म्हणजे लैबी ही वृध्द स्त्री आणि तीन दशकांपासून सुरु असलेल्या केवळ मुलींसाठीच्या तिच्या फुटबॉल क्लबची कहाणी आहे. हा माहितीपट आर्थिक आव्हाने, ईशान्य भारतातील प्राचीन गावातली पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था आणि रुढीवाद यांच्याशी सुरू असलेल्या या क्लबच्या लढ्याचे दर्शन घडवतो.

Back to top button