एकही खिडकी नसलेली ४० मजली इमारत पाहिली का? | पुढारी

एकही खिडकी नसलेली ४० मजली इमारत पाहिली का?

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात 33 थॉमस स्ट्रीट ही 40 मजली गगनचुंबी इमारत अतिशय रहस्यमय इमारतींपैकी एक मानली जाते. हैराण करणारी बाब अशी आहे की, यातील एकाही भिंतीला एकही खिडकी नाही आणि यामुळेच एकही खिडकी नसलेल्या इमारतीचा उपयोग काय, हा प्रश्न डोकावल्याशिवाय रहात नाही.

हा भूत-पिशाचांचा अड्डा आहे का, यापासून मेन ईन ब्लॅक हेडक्वॉर्टरपर्यंत दरवाजांच्या आत काय लपलेले आहे, यावर आतापर्यंत बरीच चर्चा झडत आली आहे. अगदी दिग्गज अभिनेता टॉम हॅक्सला देखील या इमारतीची भीती वाटते. 2017 मध्ये त्यांनी ही इमारत पाहिल्यानंतर आतापर्यंत पाहिलेली सर्वात भीतीदायक इमारत, असे त्याचे वर्णन केले होते.

न्यूयॉर्क शहरात 33 थॉमस स्ट्रीटवर ही इमारत उभी करण्यात आली आहे. याला लाँग लाईन्स बिल्डिंग या नावानेही ओळखले जाते. 1969 ते 1974 यादरम्यान अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची टेलिफोन स्विचिंग इक्विपमेंट ठेवण्यासाठी ही इमारत उभी करण्यात आली होती. हे इक्विपमेंट ठेवण्यासाठी हाय लेव्हल स्पेस व सुरक्षित लोकेशनची गरज असते. यामुळे 40 मजली इमारत असतानाही त्यात आतील बाजूला केवळ 33 मजले आहेत. अणू हल्ला झाल्यास आणीबाणीच्या वेळी 1500 लोकांना 2 आठवडे पुरेल इतका अन्नसाठा त्यात ठेवला जातो, अशीही वंदता होती.

ही इमारत उभी केली गेल्यानंतर 1999 पर्यंत एटी अँड टीसाठी टेलिफोन एक्स्चेंजच्या रूपात कार्यरत राहिली; पण कंपनी अन्यत्र निघून गेली आणि त्यानंतर इमारतीचा वापरही कमी झाला. आताही या इमारतीचा क्वचित प्रसंगी टेलिफोन स्विचिंगसाठी काही स्थानिक कंपन्यांकडून वापर केला जातो. मात्र, 40 मजली इमारत नेहमीच चर्चेत, वादात राहिली. ही इमारत म्हणजे नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे मुख्यालय आहे, असा दावाही वेळोवेळी केला जातो. एनएसएने या इमारतीला टायटनपॉईंटे असे नाव दिले आहे, याचा संदर्भही दिला गेला; पण एनएसएने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते रहस्य उलगडलेच नाही.

Back to top button