सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरात टोळी हद्दपार; जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई | पुढारी

सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरात टोळी हद्दपार; जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई

जत; पुढारी वृत्तसेवा : जत पूर्व भागात जमाव जमवून अशांतता माजवणे, गंभीर दुखापत करणे, घरात घुसून, गर्दी करून मारामारी करून मालमत्तेचे नुकसान करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, बेकायदा बिगर परवाना गौण खनिजाचे चोरी करणे, कायद्याचे उल्लंघन केल्याने रमेश खरात व त्यांच्या तिघा साथीदारांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली, सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाच्या कालावधी करीता हद्दपारी ची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी जगतावर दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

रमेश यशवंत खरात (वय २४),तानाजी अमसिद्ध करे (वय .२६) , संभाजी बिराप्पा शेंडगे (वय.२२) तिघेही रा. तिकोडी,महादेव उर्फ पप्पू म्हाळाप्पा करे (वय.२०) वर्ष रा. भिवर्गी या चौघांना दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. रमेश खरात व त्यांच्या टोळीतील काही सदस्यांनी गैरकारभाराची मंडळी जमवून गंभीर दुखापत करणे, लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य पार पाडत असताना त्यांना अटकाव करून बळाचा वापर करणे. सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करून मारामारी करणे. गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध असे एकूण १९ गुन्हे दाखल झाले होते.उमदी पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे सादर केला होता. याबाबतची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केली होती .त्यांनी सद्यस्थितीचा अहवाल पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे दिला होता .यानुसार चौघांना हद्दपार करण्यात आले आहे .सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे , पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केली आहे.

Back to top button