पावसाअभावी बारामती तालुका तहानलेलाच; जून गेला कोरडा | पुढारी

पावसाअभावी बारामती तालुका तहानलेलाच; जून गेला कोरडा

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाऊस बरसत असला, तरीही बारामती आणि आजूबाजूचे तालुके मात्र पावसाअभावी कोरडेच आहेत. जून संपूनही तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्यात संपूर्ण राज्यात सरासरी 209 मिमी पाऊस होत असतो.

मात्र, या वर्षी राज्यात 1 जून ते 30 जूनदरम्यान फक्त 113 मिमी पाऊस बरसला आहे. बारामती तालुक्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. त्यामुळे दुष्काळाची भीती शेतकर्‍यांना जाणवत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत, मात्र हे वादळ थांबूनही अपेक्षित पाऊस होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नाही. धरण क्षेत्रातही पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेती अडचणीत येणार आहे. शेतकरी पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. सोमेश्वर आणि माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागण हंगाम सुरू झाला आहे. वीर धरणाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेली ऊस शेती धरणात पाणी नसल्याने अडचणीत आली आहे. बागायती पट्टाही काळजीत आहे. विहिरींची पाणीपातळी घटली आहे.

पालखी सोहळा कोरडाच गेला. अनेक शेतकरी पाऊस झाल्यानंतर पेरण्या संपवूनच वारी करतात. यंदा पेरण्या न करताच अनेकांनी वारीचा रस्ता धरला. मात्र, वारी संपूनही तालुक्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पांडुरंगाचीह कृपा कधी होणार, याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.

चार्‍याचे दर गगनाला भिडले

दरवर्षी जून किंवा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भरणारे ओढे, तळी, नाले कोरडेटाक पडले असून, भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. पावसाअभावी जनावरांचा प्रश्न गंभीर असून, चार्‍याचे दर गगनाला भिडले आहेत.

हेही वाचा

वाळवा तालुका शरद पवार, जयंत पाटलांसोबतच !

शिक्रापुरात लग्नाच्या आमिषाने बलात्कार

Hasan Mushrif : पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे येण्याची शक्यता

Back to top button