आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता | पुढारी

आरटीई प्रवेश प्रक्रिया : आज अखेरची संधी; मुदतवाढीची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण (आरटीई) कायद्यानुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यात प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी अवघ्या आठ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यातच या यादीतील प्रवेश निश्चितीसाठी सोमवारी (दि. १२) संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

आरटीईनुसार खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारी २०२३ पासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमधील एक लाख १ हजार ८४६ जागांसाठी तीन लाख ६४ हजार ४१३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत ९४ हजार ७०० तर प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लॉटरीतील ६४ हजार २३१, तर प्रतीक्षा यादीतील आठ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. अद्यापही २९ हजार १६१ जागा रिक्त आहेत. दरम्यान, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेशांना विलंब झाला आहे. जूनअखेरपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील प्रवेशाची सद्यस्थिती
शाळा : ८,८२३
जागा : १,०१,८४६
लॉटरीत निवड : ९४,७००
प्रतीक्षा यादी : ८१,१२९
निश्चित प्रवेश : ७२,६८५
रिक्त जागा : २९,१६१

हेही वाचा:

Back to top button