पिंपळे गुरवमधील 23 अनधिकृत पत्राशेडवर कारवाई | पुढारी

पिंपळे गुरवमधील 23 अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

नवी सांगवी (पिंपरी ) : पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते तुळजाभवानी मंदिर येथील दुतर्फा बाजूस असणार्‍या अनधिकृत व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. या वेळी 23 व्यावसायिक अनधिकृत पत्राशेड हटविण्यात आले. कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  महापालिकेच्या ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमानातून शुक्रवारी अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड हटविण्यात आले. ड क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड व क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्त तैनात 
23 व्यावसायिक अनधिकृत पत्राशेड हटवून बारा हजार चौरस फूट क्षेत्रफळ अतिक्रमणमुक्त करण्यात आले. 10 अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, 10 मजूर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे 40 जवान, सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे, 2 पोलिस उपनिरीक्षक, 10 पोलिस अंमलदार, 5 अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
सकाळी दहा वाजता पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक येथे एका बाजूने ह क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा तर दुसरीकडे ड क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा एकाच वेळी आला. त्यातच काही वेळाने सांगवी पोलिसांची वाहने, अग्निशामक दलाचे वाहन भर चौकात दाखल झाले. रस्त्यावर, पदपथावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे जवान, पोलिस, अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याने परिसरातील नागरिकांनी एकच धसका घेतला. नेमकी कारवाई कशावर होणार? याबाबत विचारणा होत होती.
अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याआधी संबंधितांना नोटीस दिली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी अतिक्रमण विभागाकडून ही धडक कारवाई करण्यात आली. 
                                                                                       – उमाकांत गायकवाड,  क्षेत्रीय अधिकारी 

Back to top button