Chandrashekhar Bawankule : डॉ. आंबेडकर जयंतीच्या बॅनरमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत ! | पुढारी

Chandrashekhar Bawankule : डॉ. आंबेडकर जयंतीच्या बॅनरमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : बॅनरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बावनकुळे यांचा फोटो लावल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अडचणीत आले. हे बॅनर व्हायरल झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले त्यांना तातडीने माफी मागण्यास सांगण्यात आले होते. यानंतर बॅनर लावलेल्या कार्यतर्त्यांनी माफीनाफा प्रसिध्द केला.  घडलेल्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या प्रकरणी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या बॅनरमध्ये बावनकुळे यांच्या पत्नी आणि मुलगा यांचादेखील  फोटो आहे. (Chandrashekhar Bawankule)

गावागावात श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एकाच बॅनरवर शुभेच्छा दिल्या जातात. या ठिकाणी देखील तसाच प्रकार घडला.  आज दिवसभरात हे पोस्टर व्हायरल झाल्याने भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बावनकुळे यांच्या कार्यालयामार्फत व्हायरल होत असलेल्या बॅनरचा दुरान्वयेही भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. (Chandrashekhar Bawankule)

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तेथील रहिवासी घरावर बॅनर लावले होते. हे बॅनर समाजमाध्यमावर व्हायरल झाले. हा प्रकार लक्षात येताच बॅनर काढण्यात आले. सोबत व्यक्तिंनी जाहीर माफीनामा लिहून देत ही चूक आमच्याकडून झालेली आहे. याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत असे आवाहन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यलयाकडून करण्यात आले आहे.

Back to top button