दूध भेसळीसाठी अकलूजची रसद? श्रीगोंद्यात आणखी तिघांना अटक | पुढारी

दूध भेसळीसाठी अकलूजची रसद? श्रीगोंद्यात आणखी तिघांना अटक

श्रीगोंद; पुढारी वृत्तसेवा : भेसळयुक्त दूध तयार करून ते विकले जात असल्याचे प्रकरण श्रीगोंद्यात उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणाची सुई अकलूजकडे (सोलापूर) वळली असून तेथील एक व्यक्ती व्हे परमिट पावडर व लाईट लिक्विड पॅराफीनचा पुरवठा श्रीगोंदा तालुक्यात करत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी ताब्यात घेतलेल्या अनिल कुदांडे (रा. भानगाव), विशाल वागस्कर (रा. सुरोडी) व संजय मोहिते (रा. पारगाव) यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळला असून, त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

दूध भेसळ प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला दोन आरोपी निष्पन्न झाले. जसजसा तपास पुढे सरकतो आहे, तसतसा आरोपींचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत पंधरा आरोपींचा सहभाग या गुन्ह्यात निष्पन्न झाला असून, त्यातील दहा जण अटकेत आहेत. कैलास लाळगे याला अटक केल्यानंतर त्याने वरील आरोपींना पावडर आणि रसायनाचा पुरवठा करत असल्याची माहिती दिली.

तो या तिन्ही आरोपींच्या सतत संपर्कात होता, असे त्यानेच पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे आरोपी त्यातून किती भेसळयुक्त दूध तयार करत होते, त्याची विक्री कोणत्या प्लँटवर सुरू होती, याचा उलगडा पोलिस तपासात होणार आहे.

अकलूज येथूनही रसायनाचा पुरवठा
दरम्यान, पोलिस तपासात आणखी एक नवीन माहिती पुढे आली असून, अकलूज (सोलापूर) येथील एक व्यक्ती दूधात भेसळीसाठी पावडर व रसायन पुरवत होती. त्याचा भेसळयुक्त दूध तयार करणार्‍या अनेकांशी संपर्क असल्याचे समजते.

कन्हेरकर, बोडखेसह अन्य तिघे कधी सापडणार?
या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेला सतीश ऊर्फ आबा कन्हेरकर व शुभम बोडखे हे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पसार झाले आहेत. त्यांना अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप श्रीगोंदा पोलिस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. या दोघांसोबतच इतर तीन आरोपींचाही शोध सुरू आहे.

अकलूज कनेक्शनबाबत खातरजमा सुरू
पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी सांगितले, की या गुन्ह्यातील आरोपींची संख्या पंधरा झाली आहे. पाच आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा संवेदनशील असल्याने बारकाईने तपास सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक होईल. अकलूज कनेक्शनबाबत माहिती पुढे आली असली, तरी त्याबाबत खातरजमा सुरू आहे.

आरोपींना ‘मोक्का’ लावावा : सुरेश धस
याबाबत आमदार सुरेश धस यांनी दैनिक पुढारीशी बोलताना म्हणाले की, हे आरोपी लोकांना एकप्रकारे विष पाजत होते. भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी प्लँटचालकच उद्युक्त करत असतील तर ही बाब गंभीर आहे. यातून मिळणार्‍या पैशातून हे लोक प्रचंड श्रीमंत झाले आहेत. त्यांनी हा गुन्हा संगनमताने केला असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई व्हावी, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.

Back to top button