Jalgaon News : गोर सेनेचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको; आंदोलकांकडून कारची तोडफोड | पुढारी

Jalgaon News : गोर सेनेचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको; आंदोलकांकडून कारची तोडफोड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- जामनेर तालुक्यातील पहूर येथे बंजारा समाज तथा गोर सेना या संघटनेमार्फत आज विविध मागण्यांसाठी शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोर सेना संस्थापक अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजय चव्हाण, आत्माराम चव्हाण, राहुल राठोड, यांच्यासह हजारो बांधवांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देऊन रस्ता रोको आंदोलन केले.

जामनेर तालुक्यातील पहूर येथील बाजारपट्टा इथून आंदोलनाला सुरुवात झाली. वाजत गाजत मिरवणूक काढून आंदोलन संभाजीनगर जळगाव महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. तब्बल एक तास धरणे आंदोलन सुरू होते. जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना समाजातर्फे निवेदन सादर करून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सगेसोयेऱ्यांना आरक्षण देण्यासंबधातील जीआर रद्द करण्यात यावा, एसआयटी चौकशी लागू करा, बोगस दाखले देऊ नका अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. आंदोलन दरम्यान आंदोलकांनी एका भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारची तोडफोड केली.

या आंदोलनात सोयगाव, पाचोरा, जामनेर तसेच जिल्ह्यातील बंजारा समाजातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक संजय बनसोड, गणेश फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. किरकोळ घटना वगळता हे आंदोलन शांततेत पार पडले.

हेही वाचा :

Back to top button