Lok Sabha Speaker election, Om Birla again as Speaker of Lok Sabha
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ओम बिर्ला यांची निवड file photo

लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला

४८ वर्षांनंतर प्रथमच पार पडली अध्यक्षपदासाठी निवडणूक
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेकांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव होता. लोकसभेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान ओम बिर्ला यांना मिळाला आहे.

हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी सभागृहासमोर प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाच्या आधारे त्यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील ओम बिर्ला यांना सीटवर स्थानापन्न करण्यासाठी गेले होते.

लोकसभा अध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनंतर निवडणूक

लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्यास सरकारने नकार दिल्यानंतर अध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची शक्यता मावळली. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच संविधान बदलाच्या मुद्द्यावर सत्ताधारी रालोआ आघाडी सरकारला कोंडीत पकडणार्‍या काँग्रेस व विरोधी इंडिया आघाडीने मंगळवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार घोषित केला. लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांची सहमती घेऊन उमेदवार निश्चित करण्याचे सत्ताधारी भाजप व रालोआचे प्रयत्न अयशस्वी ठरले. विरोधकांनी सत्ताधार्‍यांची विनंती धुडकावून लोकसभा अध्यक्षपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनंतर निवडणूक झाली. भाजपप्रणीत रालोआ आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सुरेश मैदानात उतरले होते.

Lok Sabha Speaker election, Om Birla again as Speaker of Lok Sabha
भाजप खासदार भर्तृहरी महताब हंगामी लोकसभा अध्यक्ष

सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान

लोकसभेतील संख्याबळ एनडीएच्या बाजूने आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांचा विजय निश्चित मानला जात होता. २०१४ मध्ये ओम बिर्ला पहिल्यांदा कोटामधून लोकसभेचे खासदार झाले. २०१९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले आणि १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची एकमताने निवड झाली होती. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा कोटामधून खासदारकीची निवडणूक जिंकली आहे. आज (26 जून) सकाळी ११ वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी आवाजी मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान ओम बिर्ला यांनी मिळवला आहे.

कोण आहेत ओम बिर्ला?

४ डिसेंबर १९६२ रोजी जन्मलेले ओम बिर्ला हे तीन वेळा राजस्थान विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. २००३ मध्ये ते पहिल्यांदा कोटामधून आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर २००८ आणि २०१३ असे तीन वेळा ते आमदार राहिले. २०१४ मध्ये पहिल्यांदा कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. तीन वेळा आमदार आणि तिसऱ्यांदा खासदार झालेले बिर्ला हे संसदेच्या अनेक समित्यांचे सदस्य राहिले आहेत. १६ व्या लोकसभेत खासदार म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांना अनेक समित्यांमध्ये स्थान देण्यात आले. अंदाज समिती, ऊर्जा स्थायी समिती आणि सल्लागार समितीचे ते सदस्य राहिले आहेत.

Lok Sabha Speaker election, Om Birla again as Speaker of Lok Sabha
लोकसभा निकालानंतरही त्‍यांना शहाणपण आलं नाही : शरद पवारांचा महायुतीला टोला

लोकसभा अध्यक्ष होणारे राजस्थानचे पहिले खासदार

ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष होणारे राजस्थानमधील पहिले खासदार आहेत. गेल्या लोकसभेच्या कार्यकाळातही भाजप आणि एनडीएने त्यांना अध्यक्ष पदाचे उमेदवार केले होते आणि एकमताने त्यांची अध्यक्ष पदी निवड झाली होती. आता त्यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news