नवी दिल्ली : पाळीव कुत्रा किंवा मांजरीला साबण-शॅम्पू लावून आंघोळ घातली जात असताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल, पण कधी विषारी सापाला आंघोळ घालताना तुम्ही पाहिलंय? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.
एक माणूस चक्क किंग कोब्राला आंघोळ घालत असताना यामध्ये दिसून येतो. ‘किंग कोब्रा’ हा जगातील सर्वात मोठा विषारी सर्प म्हणून ओळखला जातो. त्याचा आहार म्हणजे अन्य साप! अशा जहाल विषारी व लांबलचक किंग कोब्राला हा माणूस एखाद्या पाळीव पशुला आंघोळ घालावे इतक्या सहजतेने आंघोळ घालतो. अर्थात थायलंडसारख्या देशात ‘स्नेक शो’ च्या निमित्ताने असे सर्प ठेवले जात असतात व तेथील कर्मचारी त्यांची अशी निगाही ठेवतात. व्हायरल होणार्या या व्हिडीओत एक व्यक्ती किंग कोब्राला चक्क शॅम्पू लावून आंघोळ घालताना दिसत आहे. हा व्यक्ती हातात शॅम्पू घेऊन या विशालकाय नागराजाला आंघोळ घालताना दिसतोय. लहान मुलांना ज्याप्रमाणे मालीश करून आंघोळ घातली जाते, त्यप्रमाणे हा व्यक्ती कोब्राला आंघोळ घालताना दिसतोय. आंघोळ घालत असताना अचानक साप त्या व्यक्तीच्या मानेला विळखा घालतो, पण तो व्यक्ती अगदी सहज तो विळखा सोडवतो आणि पुन्हा त्याला पाण्याखाली धरतो.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत 6.16 कोटींहून जास्त लोकांनी पाहिला आहे. हजारो युजर्सने या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ‘सापाला आंघोळ घातल्यानंतर बेबी पावडर लावायला विसरू नकोस’, असा सल्ला त्या व्यक्तीला दिलाय. तर एका युजरने म्हटलेय ‘भावाची यमराजसोबत मैत्री दिसतेय’. एका युजरने या व्यक्तीला अमर राहाण्याचं वरदान मिळालेलं दिसतंय, अशी प्रतिक्रिया नोंदवलीय. विषारी सापांमध्ये कोब्रा किंवा नाग ही एक विषारी प्रजाती आहे. मात्र कोब्रा आणि किंग कोब्रा यांच्यात मोठा फरक असतो. ‘इंडियन कोब्रा’ म्हणजेच फणीवर ‘व्ही’सारखे चिन्ह असलेल्या सामान्य नागाची लांबी साधारण 4 ते 7 फूट असते. तर किंग कोब्राची लांबी तब्बल 13 फुटांहून जास्त असते.