पुढारी ऑनलाईन डेस्क : ईडीनंतर आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) दिल्लीचे मुख्यमंत्री, आप नेते अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते. मंगळवारी (२५ जून) सीबीआयने दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले आहेत. CM Arvind Kejriwal
तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री, आप नेते अरविंद केजरीवाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) सलग २ दिवस चौकशी करत आहे. मंगळवारीही त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवले. सीबीआयला आज (दि.२६) केजरीवाल यांना ट्रायल कोर्टात हजर करण्याची परवानगीही मिळाली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टात हजेरी लावताना त्यांना अधिकृतपणे अटक होण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे. भाजपचे केंद्र सरकार आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा कट सीबीआयकडून रचला जात आहे. सीएम केजरीवाल यांना जामीन मिळू नये यासाठी हे सर्व केले जात आहे. CM Arvind Kejriwal
भाजप आणि केंद्र सरकारचे अत्याचार आणि अन्याय संपूर्ण देश पाहत आहे. भाजपच्या अतिरेकाविरोधात संपूर्ण देश अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभा आहे आणि या अन्यायाविरोधात एकत्रितपणे आवाज उठवेल असेही ते म्हणाले.