David Warner : टी-20 विश्वचषकातून बाहेर पडताच वॉर्नरचे ‘क्रिकेट’ संपुष्टात!

भारताविरुद्धचा सामना शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला
David Warner international cricket career ends
वॉर्नरने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 7 डावात 29.66 च्या सरासरीने 178 धावा केल्या. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : David Warner : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी चार संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. भारत आणि अफगाणिस्तानने गट 1 मधून तर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी गट 2 मधून उपांत्य फेरी गाठली आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला आणि बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून या दोन्ही संघांना स्पर्धेतून बाहेर काढले. अफगाणिस्तानने प्रथमच आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अफगाणिस्तानचा विजय आणि ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पडल्यामुळे टी-20 क्रिकेटमधील दिग्गज डेव्हिड वॉर्नरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपुष्टात आले आहे.

Summary
  • ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडले आहे.

  • यासह डेव्हिड वॉर्नरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपुष्टात आले आहे.

  • भारताविरुद्धचा सामना त्याचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

डेव्हिड वॉर्नरने या आधीच स्पष्ट केले होते की तो टी-20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला वनडे आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताविरुद्धचा सामना त्याचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.

डेव्हिड वॉर्नरने 15 वर्षांपूर्वी 2009 मध्ये आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती आणि आता तो आपला शेवटचा सामना भारतीय संघाविरुद्ध खेळला आहे. या शेवटच्या सामन्यात अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

2024 च्या टी-20 विश्वचषकात वॉर्नरची कामगिरी

वॉर्नरने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 7 डावात 29.66 च्या सरासरीने आणि 139.06 च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या. त्याने ग्रुप स्टेजमध्ये ओमानविरुद्ध 56 आणि बांगलादेशविरुद्धही नाबाद 53 धावांची इनिंग खेळी होती.

एकूण 44 टी-20 विश्वचषक सामने खेळले

वॉर्नरने टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 44 सामने खेळले असून 25.89 च्या सरासरीने आणि 134.24 च्या स्ट्राइक रेटने 984 धावा केल्या. दरम्यान, त्याने 8 अर्धशतकेही झळकावली. या स्पर्धेच्या इतिहासात तो ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियासाठी जिंकला 2021 चा टी-20 विश्वचषक

वॉर्नरने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 110 सामन्यांत 3277 धावा केल्या. यादरम्यान त्याने 28 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 2021चा टी-20 विश्वचषक जिंकला. त्या स्पर्धेत तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

वॉर्नरची वनडे कारकीर्द

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू म्हणून वॉर्नरने आपली एकदिवसीय कारकीर्द संपवली. त्याने 161 सामन्यात 45.30 च्या सरासरीने आणि 97.26 च्या स्ट्राईक रेटने 6,932 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 22 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियासाठी फक्त रिकी पाँटिंगने (29) त्याच्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 33 अर्धशतकेही झळकावली आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 179 धावा आहे.

वॉर्नरची कसोटी करिअर

वॉर्नर हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याने 112 कसोटी सामन्यांमध्ये 44.59 च्या सरासरीने 8,786 धावा केल्या. या कालावधीत त्याने 26 शतके आणि 37 अर्धशतके फटकावली आहेत. ऑस्ट्रेलियासाठी फक्त स्टीव्ह स्मिथ (9,685), स्टीव्ह वॉ (10,927), ॲलन बॉर्डर (11,174) आणि पाँटिंग (13,378) यांनी कसोटी सामन्यांमध्ये जास्त धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news