IFFI 2023 : ‘हवामान संकटाने फक्त मानवच निर्वासित होत नाहीत तर इतर सजीवही होतात’ | पुढारी

IFFI 2023 : 'हवामान संकटाने फक्त मानवच निर्वासित होत नाहीत तर इतर सजीवही होतात'

प्रभाकर धुरी

पणजी

हवामान संकटाने फक्त मानवच निर्वासित होत नाहीत तर इतर सजीवही होतात, असे मत ग्रीक चित्रपट निर्माते अँजेलोस रॅलिस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडले. हवामान बदल आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वी ग्रहालाच निर्माण होत असलेल्या धोक्याकडे आता सर्वांनी लक्ष देण्‍याची तातडीची गरज आहे, असे प्रतिपादन ‘ मायटी आफ्रीन: इन द टाईम ऑफ फ्लड्स’ या ग्रीक चित्रपटाचे दिग्दर्शक अँजेलोस रॅलिस यांनी केले. ५४ व्या इफ्फीमध्ये त्यांचा हा चित्रपट ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड कॅटेगरी’ अंतर्गत प्रदर्शित होत असताना ते माध्यमांशी बोलत होते.

संबंधित बातम्या –

अँजेलोस रॅलिस यांनी यावेळी सांगितले की, आपल्याला छायाचित्रण, मानववंशशास्त्र यांची विशेष आवड आहे. त्यामुळे या चित्रपटावर आपल्याला या दोन्‍ही विषयांचे असलेले ज्ञान आणि आवड यांचा परिणाम पहायला मिळतो. रॅलिस यांनी सांगितले की, “हा चित्रपट म्हणजे पाच वर्षांहून अधिक काळ केलेली एक ‘ रोड ट्रिप’ आहे. या प्रवासात मला अगदी लुंगी घालावी लागली, अनवाणी चालावे लागले, गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मला त्या गावातल्या वयस्करांबरोबर काम करावे लागले.”

या चित्रपटातील मुख्‍य पात्र आफ्रिनविषयी माहिती देताना अँजेलो रॅलिस म्हणाले की, उपेक्षित, वंचित लोकांनाही जगण्‍याचा हक्‍क आहे, त्‍यांना तो मिळवून देण्‍यासाठी आफ्रिन दृढनिश्‍चयी आहे. त्यांच्यासाठी ती काहीही करण्‍याचं धाडस, धैर्य या नायिकेकडे आहे. दृढनिश्चयाचे आणि धैर्याचे प्रतिनिधित्व करणारी ही नायिका आहे. चित्रपटात, तिला हवामान बदल आणि परिणामी त्यामुळे होणारे विस्थापन यांचे अतिशय भयावह परिणाम भोगावे लागतात, असे दाखवण्यात आले आहे. अशा संकटामध्‍ये आफ्रिन अतुलनीय धैर्य आणि त्यावेळी आवश्‍यक असणारे काम करण्‍याची धमक दाखवली आहे. यामुळे तिला येणाऱ्या मोठ्या संकटांमध्येही आशेचा किरण दिसतो.

ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यावर म्हणजे संकटावर तरंगताना आणि बदलत्या जगाच्या आव्हानांचा जणू तिला अंदाज येतो. अशा स्थितीत मार्गक्रमण करणाऱ्या १२ वर्षांच्या आफ्रिनची विलक्षण कथा “मायटी आफ्रिन: इन द टाईम ऑफ फ्लड्स”मध्ये आहे. बांगलादेशातील ब्रह्मपुत्रा नदी, तिचे महाप्रंचड पात्र, आणि आफरीनचा प्रवास अशी कथा पुढं सरकते. तिच्या घराला वेढून टाकणाऱ्या विनाशकारी पुरामध्‍ये कुठेतरी गायब झालेल्या आपल्या वडिलांच्या शोधात नायिका ढाकासारख्या गजबजलेल्या महानगराकडे येते.

Back to top button