बहुविवाह, निकाह-हलाला पद्धतीवर घटनापीठ सुनावणी घेणार | पुढारी

बहुविवाह, निकाह-हलाला पद्धतीवर घटनापीठ सुनावणी घेणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा-मुस्लिम धर्मातील बहुविवाह तसेच निकाह हलाला पद्धतीविरोधात घटनापीठासमक्ष तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधीशांकडे केली; पंरतु, न्यायालयाने सुनावणीसाठी अद्याप कुठलीही तारीख निश्चित केलेली नाही. योग्य वेळ आल्यावर घटनापीठ स्थापन केले जाईल, असे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे लवकरच या याचिकांवर सुनावणीसाठी घटनापीठ स्थापन करीत सुनावणीस सुरुवात होण्याची शक्यता आहे.

३० ऑगस्ट २०२२ रोजी बहुविवाह तसेच निकाह हलाला पद्धतीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने नोटीस बजावत केंद्र सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून उत्तर मागवले होते. याचिकाकर्त्या तीन मुलांची आई समीना बेगम दोनवेळा तीन तलाक पद्धतीची बळी पडली आहे. बहुविवाह तसेच निकाह-हलाला ला मान्यता देणारे मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत) १९३७ चे कलम २ ला घटनेतील अनुच्छेद १४,१५, २१ तसेच २५ चे उल्लंघन करणारे घोषित केले जावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

भारतीय दंड संहिता १८६० च्या तरतूदी सर्व भारतीय नागरिकांवर समानतेने लागू व्हावे, अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तिहेरी तलाक आयपीसीचे कलम ४९८अ अंतर्गत एक क्रुरता आहे. निकाह हलाला आयपीसीचे कलम ३७५ अन्वये बलात्कार असून बहविवाह आयपीसी कलम ४९४ अन्वये एक गुन्हा असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरयेथील फरजाना यांनी बहुविवाह तसेच हलाला घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करीत याचिका दाखल केली आहे. या पद्धतीविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आता सर्वोच्‍च न्‍यायालयाचे घटनापीठ यावर सुनावणी घेणार आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button