

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी शनिवार (दि.२०) रोजी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या पहिल्या चार तासांत जिल्ह्यात सरासरी १४.५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यावल नगर परिषदेत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असून भुसावळमध्ये मतदानाचा टक्का सर्वात कमी दिसून येत आहे.
नगर परिषदेनिहाय मतदानाची टक्केवारी (सकाळी ११.३० पर्यंत) अशी..
यावल नगर परिषदेत मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत असून येथे २८.१३ टक्के मतदान झाले आहे. सावदा येथे १५.८२ टक्के, वरणगावमध्ये १५.३६ टक्के तर अमळनेर नगर परिषदेत १४.४२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पाचोरा येथे आतापर्यंत १२.३३ टक्के मतदान झाले असून भुसावळमध्ये केवळ १०.६७ टक्के मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ३३,६६२ असून सकाळी ११.३० वाजेपर्यंत ४,९०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये २,६८१ पुरुष आणि २,२२२ महिला मतदारांचा समावेश आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत केवळ ४.२६ टक्के मतदानाची नोंद झाली असून त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.