

नाशिक : साहित्याची नगरी आणि कलेचे माहेरघर असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा भक्ती आणि लोकसंगीताचा त्रिवेणी संगम जुळून येत आहे. ९० च्या दशकात ज्या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर गारूड घातले होते, तोच 'लोक रामायण' हा अजरामर कार्यक्रम आता नव्या संचात आणि भव्य स्वरुपात नाशिककरांच्या भेटीला येत आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. २० डिसेंबर) दुपारी साडेबाराला कालिदास कलामंदिरात होणार आहे.
प्रभू श्रीरामाची कथा ही केवळ कथा नसून तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. हीच रामकथा लोकसंगीताच्या माध्यमातून, मातीतील सुरांच्या साहाय्याने मांडण्याचा प्रयत्न सद्गुरू नारायण सांस्कृतिक अधिष्ठान आणि नवारंभ शिक्षण संस्था यांनी केला आहे. कवी राम उगावकर यांच्या शब्दांना आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या सुमधूर संगीताला नामवंत गायक आपल्या स्वरांनी सजवणार आहेत.
हा कार्यक्रम केवळ करमणूक नसून त्यामागे एक उदात्त हेतू आहे. मातृभाषा टिकल्या तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल यास प्रमाण मानून कार्यरत असलेल्या 'अंकुर विद्या मंदिर' या शाळेच्या मदतीसाठी या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वापरला जाणार आहे. नाममात्र देणगी मूल्यात या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने सर्व रसिक नाशिककरांनी या सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
गिरीश चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा रंगणार आहे. हेमंत शेजवलकर, उदय कुलकर्णी, धनंजय मनोहर, राजेंद्र बुरसे, अमोल पाळेकर यांच्यासह अनेक युवा आणि अनुभवी गायक वादकांचा संच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. कार्यक्रमाचे निवेदन सुप्रिया देवघरे आणि आरती शिरवाडकर करणार आहेत.