

Parli illegal liquor seized
परळी वैजनाथ : परळीच्या पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारू साठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान परळी नगर परिषदेतील निवडणूक सुधारित कार्यक्रमांतर्गत उर्वरित तीन प्रभागातील मतदान होण्याच्या पूर्व संध्येला पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
शुक्रवारी (दि. १९) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.
या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दीड लाखांहून अधिक रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे शनिवारी (दि. २०) सकाळी १०.३४ वाजता ईश्वर रेशमाजी बहीरे (वय ३५, रा. कन्हेरवाडी, ता. परळी वै., जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.