

पुणे: एकतर्फी प्रेम होते तसेच त्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, तिचे दुसऱ्यासोबत लग्न झाले. याचाच राग मनात धरून त्याने तिच्या पतीलाच संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत एका अल्पवयीन मुलासह दोघांना जेरबंद केले. सुशांत संदीप मापारे (वय 21, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे; मूळ रा. पिंपळगाव ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
14 डिसेंबरला दीपक गोरख जगताप (वय 22, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचा मृतदेह माळशिरस येथील रामकाठी शेतशिवारात आढळला होता. दीपकवर धारदार हत्याराने वार करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. याबाबत मृताचे मामा संतोष रोहिदास शेंडकर (वय 46, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी संशय व्यक्त करत जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस व जेजुरी पोलिस तपास करत होते. या वेळी आरोपी मापारे याचा पथाकाद्वारे शोध घेतला जात असताना तांत्रिक तपासात आरोपी हा जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. तो यवत परिसरात लपून बसला असल्याची माहिती समजल्यानंतर मापारे याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जेजुरी पोलिस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक अमित सिदपाटील, महेश पाटील यांच्या पथकाने केली.
मृतदेह शेतशिवारात फेकला
सुशांत मापारे याचे मृत दीपक जगताप यांच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिच्यासोबत लग्न करण्याची आरोपीची इच्छा होती. परंतु, तिचे लग्न दीपक यांच्याबरोबर झाल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणातून त्याने दीपक यांना दारू पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेतले. त्यानंतर एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून खून केला. नंतर मृतदेह माळशिरस गावच्या रामकाठी शेतशिवारात फेकून दिला.