Ambarnath News Bogus Voter: अंबरनाथमध्ये खळबळ! २०० संशयित बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात; भाजप-काँग्रेसच्या आरोपानंतर मोठी कारवाई
Municipal Council Election Voting: नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबरनाथमध्ये बोगस मतदानाचा मोठा संशय व्यक्त केला जात आहे. अंबरनाथ पश्चिममधील कोसगाव परिसरातून पोलिसांनी जवळपास २०० संशयित बोगस मतदारांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिममधील कोसगाव परिसरातील एका सभागृहात भिवंडीवरून आलेले सुमारे २०० नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. हे सर्वजण बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी या नागरिकांना जाब विचारला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने अंबरनाथ पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांची कारवाई आणि चौकशी
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या सर्व २०० जणांना ताब्यात घेतले. सध्या या सर्वांना अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या इमारतीत ठेवण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.
ओळख पटवण्याची प्रक्रिया: पोलिसांनी या नागरिकांकडील आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा केले असून, त्या माध्यमातून त्यांची खरी ओळख पटवली जात आहे.
हे नागरिक भिवंडीवरून अंबरनाथमध्ये नक्की कोणाच्या सांगण्यावरून आले? ते कोणासाठी मतदान करणार होते? आणि त्यांच्याकडे अंबरनाथमधील मतदार ओळखपत्रे आहेत का? या प्रश्नांचा पोलीस शोध घेत आहेत.
दोन्ही पक्षांचे गंभीर आरोप
अंबरनाथमध्ये काल रात्रीपासूनच बोगस मतदारांच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
"जर चौकशीदरम्यान हे सर्व नागरिक बोगस मतदानासाठी आल्याचे सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

