

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कवितेद्वारे ठाकरे गटावर निशाणा साधला. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनीही कवितेतूनच त्यांना आरसा दाखवला. या दोन्ही नेत्यांच्या कविता सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मनसेच्या पांगुळगाड्याची आशा
स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत, घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत, 'करून दाखवले 'चे गाताहेत जर गाणे, पॉकेट बुकमध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने ? अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा तथाकथित मर्दाच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळगाड्याची आशा, मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादी (श.प.) च्या दारात पसरून पदर म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर यांनी काय केले.. सजवली याकूब मेमनची कबर ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम काय करणार हे मुंबईकरांसाठी काम?
हे ढोंगी शिकवणार हिंदुत्वाचा गजर
दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत, उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत.. करून दाखवलं या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार, ठाकरेंच्या भीतीपोटी करताहेत नकलीपणाचा शृंगार.. मुंबईचे पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा, राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा..
हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर, आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर.. सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते, अधूनमधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याची खाज त्यांना येते..