बालेवाडीत शाळेसमोर उपोषण; सुविधांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय | पुढारी

बालेवाडीत शाळेसमोर उपोषण; सुविधांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

बाणेर; पुढारी वृत्तसेवा : बालेवाडी येथे महापालिकेच्या कै. बाबुराव गेणुजी बालकवडकर शाळेत (क्र. 152 व 121) विविध सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यात विद्यार्थी व पालक काही काळ सहभागी झाले होते. परंतु, या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने सायंकाळी पाचपासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, गेले पंधरा ते वीस दिवस वारंवार शाळेतील समस्या सोडवण्यासाठी शिक्षण विभागाशी पत्रव्यवहारही केला. परंतु, प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध न केल्यामुळे अखेर लाक्षणिक पोषण करण्याचा निर्णय घेतला. या शाळेत दीड हजार विद्यार्थी शिकत असून, त्यांच्यासाठी केवळ एकच शिपाई आहे. तसेच सफाई कर्मचार्‍यांचादेखील अभाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचे वर्ग स्वत: झाडावे लागत आहेत.

शाळेत पाण्याची समस्या आहे. वर्गखोल्यांचा अभाव असल्याने एकाच वर्गात 60 ते 70 विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. तसेच पुरेसे क्रीडांगणदेखील उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांची स्वच्छताही केली जात नाही. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारी केलेल्या लाक्षणिक उपोषणाची दखल वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतली नसल्याने सायंकाळपासून बेमुदत उपोषण सुरू केल्याचे बालवडकर यांनी सांगितले. या उपोषणाला भागातील स्थानिक राजकीय व सामाजिक प्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. तसेच विद्यार्थी व पालकांनी काही वेळ उपोषणात सहभागी होत घोषणा देऊन शाळेतील असुविधा दूर करण्याची मागणी केली.

या शाळेमध्ये कर्मचारी व सेविकांची संख्या वाढवण्यात आली आहे. आणखी काही अडचणी असतील, तर त्या सोडवण्याचा आगामी दिवसांत प्रयत्न केला जाईल.

                                                                     -सुरेश उचाळे,
                                            अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

Back to top button