

What is Sex Sorted Semen Explained in Marathi
पुणे: जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सेक्स सॉर्टेड सीमेन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.
सेक्स सॉर्टेड सीमेनमुळे गाईच्या वासराचे लिंग आधीच ठरवता येते. या तंत्रज्ञानामुळे सुमारे 90 टक्के मादी वासरू जन्मण्याची शक्यता असते. दुग्धव्यवसायासाठी मादी जनावरे महत्त्वाची असल्याने हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
दुग्धव्यवसायात खर्च वाढत असून, नर वासरांच्या संगोपनाचा आर्थिक भारही वाढतो. हा भार कमी करण्यासाठी आणि उत्पादनक्षम जनावरांची संख्या वाढवण्यासाठी सेक्स सॉर्टेड सीमेनचा वापर आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.या तंत्रज्ञानामुळे दूध उत्पादनक्षम मादी जनावरांची संख्या वाढते, अनावश्यक नर वासरांची संख्या कमी होते आणि पशुधनाची जात सुधारण्यास मदत होते.
त्यामुळे पशुपालकांचा खर्च कमी होऊन दूध उत्पादन व उत्पन्नात वाढ होते. जिल्हा परिषद पुणे, पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
काय होणार फायदे?
मादी वासरांची संख्या वाढल्याने दूध उत्पादनात वाढ
अनावश्यक नर वासरांची संख्या कमी
जनावरांची जात सुधारणा व उच्च उत्पादनक्षमता
पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास मदत
संगोपन खर्चात बचत व व्यवस्थापन सुलभता