संगमनेर : काहींनी चुकीच्या पद्धतीने राजकारण घडवले : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : काहींनी चुकीच्या पद्धतीने राजकारण घडवले : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक शिक्षक मतदासंघातून सत्यजित तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतो, असे सांगत गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी घडल्या त्या सर्व घडामोडींचे काही जणांनी चुकीच्या पद्धतीने राजकारण घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, आ. बाळासाहेब थोरात यांनी नामोल्लेख न करता केला.

आ. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.5) शहरातील जाणता राजा मैदानावर आनंद, मिलिंद, आदर्श व उत्कर्ष शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम पार पडला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने आ. थोरात यांनी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी मोठे राजकारण झाले. ते पक्षीय राजकारण आहे. त्या बाबतच्या मी भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळविल्या आहेत. त्यातून माझ्यासह वरिष्ठ व्यवस्थित मार्ग काढू, त्याची अजिबात काळजी करू नका, मात्र महिन्याभरात जे राजकारण झाले ते मला व्यथित करणारे असल्याची खंत आ. थोरात यांनी व्यक्त केली.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्यावेळी महिनाभरात जे राजकारण झाले ते मी पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. पक्ष पातळीवर व माझ्या पातळीवर त्यामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य पद्धतीने करू. याबाबत आपण काही काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगत त्यामध्ये आपण पुढे जाऊ. काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे.

मधल्या काळामध्ये विधान परिषदेचे राजकारण सुरू होते. त्यामध्ये काही बातम्या अशा आल्या की, भारतीय जनता पक्षापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवले. एवढेच नाही तर भाजपक्षाच्या तिकिटाचे वाटपसुद्धा करून टाकले. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे आपण पाहिले आहे. अनेक प्रकारच्या चर्चा त्यांनी घडवून आणल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. आत्तापर्यंत त्या विचाराने वाटचाल केली. आपली या पुढील वाटचालसुद्धा त्याच विचाराने राहणार आहे, यांची ग्वाही देतो, असे आ. थोरात यांनी स्पष्ट केले.

संगमनेर तालुक्याने कायमच संघर्ष केला आहे. संघर्षातून आपण मोठे झालो. निळवंडे धरण व कालव्यांच्या कामाकरिता केलेला संघर्ष असेल, प्रवरानदीच्या पाण्याचा वाटा मिळण्याकरिता केलेला संघर्ष असेल. प्रत्येक गोष्टीतून संघर्षातून आपण यश मिळवित पुढे गेलो. या संघर्षातून आपण बाहेर येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ता बदल झाल्यानंतर संगमनेर तालुक्यावर हल्ले
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सतत संगमनेर तालुक्यावर सूड उगवावा, अशा पद्धतीने हल्ले होताना दिसतात. अनेक कार्यकर्त्यांना त्रास कसा देता येईल, असे पाहिले जाते आहे. त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यांचे उद्योग, व्यवसाय बंद पाडण्यापर्यंतसुद्धा गेले आहे. तालुक्यात विकास कामे बंद पाडण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला.

Back to top button