

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्ये लढा, अगदीच शक्य नसेल तरच मैत्रीपूर्ण लढा, अशा सूचना एनडीएमधील दिल्लीस्थित वरिष्ठांनी महायुतीतील घटक पक्षांना दिल्याचे समजते.
राज्यात २९ महानगर पालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायतींचा पहिला टप्पा झाला आहे. यामध्ये काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकले होते. दरम्यान काही ठिकाणी यामुळे कटुता आल्याचे चित्र होते. युतीतील नेत्यांचेच पक्षप्रवेश इकडून तिकडे होत होते. त्याचे परिणाम स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर दिसले होते. या विषयांच्या अनुषंगाने काही नेत्यांना दिल्लीवारी करावी लागली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महानगर पालिका निवडणुकांपूर्वी एनडीएतील वरिष्ठांनी महायुती म्हणून एकत्र लढण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर अशा २९ प्रमुख महानगर पालिकांची निवडणूक होत आहे. या सर्व ठिकाणी महायुतीला सत्ता मिळवण्याची अपेक्षा आहे. जिथे ज्या पक्षाचे प्राबल्य आहे तिथे त्यांना महत्व देऊन सर्वांचे योग्य समायोजन करावे, घटक पक्षांचा योग्य सन्मान राखावा आणि एकजुटीने काम करून निवड जिंका, अशा सूचना राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. जिथे अगदीच शक्य नाही तिथे स्थानिक पातळीवर सोयीनुसार नियोजन करा मात्र मित्रपक्षात कटुता वाढेल, विरोधकांना फायदा होईल असे काहीही होऊ नये, याची काळजी घेण्याच्याही सूचना दिल्याचे समजते.