

Income Tax Department raids Shilpa Shetty's restaurant
मुंबई : पुढारी ऑनलाईन
Shilpa Shetty: आयकर विभागाने गुरुवार, 18 डिसेंबर रोजी मुंबईत अनेक फूड आणि बेव्हरेज कंपन्यांच्या कार्यालयांवर करचुकवेगिरीच्या आरोपाखाली छापे टाकले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटवरही आयकर विभागाची छापेमारी झाली आहे.
मुंबईत गुरुवारी शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटवर आयकर विभागाने छापा टाकला. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, आयकर विभागाने मुंबईतील अनेक फूड आणि बेव्हरेज कंपन्यांच्या कार्यालयांवर करचुकवेगिरीच्या आरोपाखाली छापे टाकले असून, त्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी संबंधित एका कंपनीचाही समावेश आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, बुधवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे 20 ते 24 ठिकाणी छापे टाकले जात आहेत, कारण या क्षेत्रातील काही कंपन्यांविरोधात कारवाई करण्यासाठी विभागाला ठोस माहिती मिळाली होती.
६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही
सूत्रांनी सांगितले की, तपासादरम्यान शिल्पा शेट्टी आणि काही अन्य व्यक्तींच्या मालकीच्या एका रेस्टॉरंटच्या काही कार्यालयांचा समावेश होता. मात्र, त्यांच्या मुंबईतील घरावर कर अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याचे त्यांनी फेटाळून लावले आहे. कर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आयकर विभागाची ही चौकशी महाराष्ट्र पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरोधात (फसवणुकीच्या आरोपाखाली) दाखल केलेल्या एफआयआरशी कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. तसेच, बेंगळुरू पोलिसांनी एका स्थानिक रेस्टॉरंटविरोधात कायदेशीर कामकाजाच्या वेळेनंतरही ते सुरू ठेवण्यात आल्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या प्रकरणाशीही या तपासाचा काहीही संबंध नाही.
फसवणूक प्रकरणावर शिल्पा शेट्टी यांची प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूतील हा रेस्टॉरंट शिल्पा शेट्टीच्या सह-मालकीचा आहे. या रेस्टॉरंटच्या मालकी हक्कात अभिनेत्रीचाही समावेश आहे. याशिवाय, शिल्पा शेट्टी आणि तिचे पती तसेच व्यावसायिक राज कुंद्रा हे कथित ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामुळेही कायदेशीर वादात अडकले आहेत. अलीकडेच राज कुंद्रा यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला. त्यांनी स्वतःवर लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असून, तपासात आपण पूर्ण सहकार्य केले असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, फसवणूक प्रकरणाची चौकशी सुरू असताना शिल्पा शेट्टी यांनीही मौन सोडले आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात त्यांचे नाव चुकीच्या पद्धतीने गोवले गेले आहे. संबंधित कंपनीतील आपली भूमिका मर्यादित आणि दैनंदिन कामकाजाशी (नॉन-ऑपरेशनल) संबंधित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.