सांगली : विट्यातील पोल्ट्री व्यावसायिंकाविरोधात नागरिकांचे उपोषण; आमदार बाबर यांनी दिली भेट | पुढारी

सांगली : विट्यातील पोल्ट्री व्यावसायिंकाविरोधात नागरिकांचे उपोषण; आमदार बाबर यांनी दिली भेट

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यातील रहिवाशी भागातील पोल्ट्री बंद करा या मागणीसाठीलाक्षणिक उपोषण आंदोलन सुरु केले आहे. विटा भागातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे यांनी महसूल भवन इमारतीच्या समोर हे उपोषण केले आहे. येथील पोल्ट्री व्यावसायिकांविरोधात शिवाजीनगर, शाहू नगर आणि सुतारकीतील नागरिकांनी याची तक्रार आमदार अनिल बाबर यांच्याकडे केली आहे. कोणाकडेही तक्रार करा मुख्यमंत्र्यांपासून अगदी शरद पवारांपर्यंत सगळे आमच्या खिशात आहेत, अशी भाषा विट्यातील काही मुजोर पोल्ट्री व्यवसायिक करीत असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

विट्यातील शिवाजीनगर, शाहूनगर आणि सुतारकी परिसरात रहिवासी क्षेत्रात अनेक पोल्ट्री आहेत. या भागातील ३०० ते ४०० कुटुंबांना गेली अनेक वर्षे या पोल्ट्रींच्या दुर्गंधीचा आणि माशांचा प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राहुल शितोळे यांनी याची जिल्हाधिकारी यांच्याकडे आपले सरकार पोर्टलवर याची तक्रार केली.

यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विटा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली. यावर तत्कालीन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी ३० एप्रिल २०२० रोजी विट्यातील रहिवासी क्षेत्रातील पोल्ट्री बंद करण्यात येतील असा निर्णय दिलेला होता. अशी माहिती पाटील यांनी दिली. मात्र अद्याप या पोल्ट्रीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

शितोळे यांनी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी याबाबत पालिकेला पुन्हा पत्र दिले. तरी देखील यावर कोणतीच कार्यवाही केली नाही म्हणून शितोळे यांनी ऐन प्रजासत्ताक दिना दिवशीच उपोषण जाहिर केले. याबाबत शितोळे म्हणाले की, याआधी पर्यावरण विभागाचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी पोल्ट्री परिसरातील पाहणी केली. त्यावर त्यांची दिशाभूल केली त्यामुळे त्यांनी येथे कोणत्याही पोल्ट्री नाहीत असे शासनाला कळवले आहे, असे शितोळे यांनी सांगितले.

दरम्यान गुरुवारी प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी उपोषण स्थळी येऊन राहुल शितोळे यांची भेट घेतली. यावेळी विटा मर्चंट बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, गजानन सुतार, आनंदराव माळी, राजूभाऊ तोडकर, उत्तमराव चोथे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार बाबर यांनी आंदोलकांशी चर्चा केली असता नागरिकांनी अलीकडच्या काळात काही पोल्ट्री मालक एवढे मुजोर झाले आहेत की ते कोणाकडेही तक्रार करा अगदी मुख्यमंत्र्यांपासून शरद पवारांपर्यंत सगळे आमच्या खिशात आहेत अशी भाषा करीत आहेत, त्यामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. तर राहुल शितोळे यांनी एकतर रहिवासी क्षेत्रातील पोल्ट्री व्यवसाय बंद करा अन्यथा विट्याच्या रि.स.नं. ३२७ मधील पोल्ट्री व्यवसाय कायदेशीर असून पालिका हद्दीत रहिवास विभागात पोल्ट्री व्यवसायास कायदेशीर परवानगी आहे असे लेखी पत्र तरी मिळावे अशी मागणी केली.

हेही वाचा

Back to top button