फिफा वर्ल्डकप 2022 कतार : ब्राझीलला र्‍हिदम सापडला | पुढारी

फिफा वर्ल्डकप 2022 कतार : ब्राझीलला र्‍हिदम सापडला

       विश्वचषक विश्लेषण

  • प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील

बलाढ्य ब्राझीलने दक्षिण कोरियाचा 4-1 गोलने एकतर्फी पराभव करत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात ब्राझील विजयी होणार की, दक्षिण कोरिया पुन्हा एकदा बलाढ्य संघाला हरवण्याचा करिष्मा करणार, हे पाहण्यास सर्वच फुटबॉलप्रेमी उत्सुक होते; पण बलाढ्य ब्राझीलने वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर विजय मिळवला. या संपूर्ण सामन्यात कोरियाचा संघ कुठेच दिसला नाही. ब्राझीलसमोर हा संघ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरला. ब्राझीलने पहिल्या मिनिटापासूनच वेगवान सुरुवात केली होती. नेमार परतल्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावलेला जाणवत होता. पहिल्या दहा मिनिटांत दोन गोल करत ब्राझीलने त्यांचा इरादा स्पष्ट केला होता. पहिल्या हाफमध्ये एकूण चार गोल करत ब्राझीलने सामना आपल्या बाजूने वळवला. 4-3-3 या परमिशनने खेळताना ब्राझीलला कसे थोपवावे, याचे उत्तर कोरियाकडे नव्हते. नेमारला मार्क करणार हे लक्षात घेऊनच प्रशिक्षकांनी रणनीती आखली होती आणि त्याप्रमाणे ब्राझीलकडून उजव्या फ्लँकमधून आक्रमणे झाली. गोलकिपर एलिसननेसुद्धा उत्कृष्ट गोलरक्षण केले. एकंदर सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ केला. वेगवान खेळ, अचूक शॉर्ट पासिंग, उत्कृष्ट फिनिशिंग याचा योग्य समन्वय दाखवत त्यांनी या स्पर्धेत फेव्हरिट का आहोत, हे दाखवून दिले.

हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या पेले यांनी या सामन्याअगोदर एक ट्विट करत, ते हा सामना हॉस्पिटल बेडवरून बघतील, असे सांगितले होते. ब्राझीलियन संघाने या सामन्यातील खेळाद्वारे पेले यांना त्यांच्या काळातील फुटबॉलच्या अनेक आठवणी जागरूक करून दिल्या असतील, हे नक्की. 2002 नंतर विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात ब्राझीलला अपयश आलेले आहे. कोरियाविरुद्धच्या सामन्यापासून स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आवश्यक चांगला र्‍हिदम ब्राझीलला सापडलेला आहे. हा र्‍हिदम अंतिम सामनापर्यंत कायम राखल्यास ब्राझीलला कोणीही रोखू शकणार नाही. बेल्जियम, जर्मनी यासारखे तगडे संघ अगोदरच स्पर्धेबाहेर गेल्यामुळे ब्राझीलला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी चालून आलेली आहे. या सुवर्णसंधीचा फायदा ते उठवू शकतात की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

जपानचा शिस्तबद्ध खेळ; पण नशीब क्रोएशियाच्या बाजूने

या विश्वचषक स्पर्धेतील जपान आणि क्रोएशिया या दोन जिगरबाज संघांमधील सामन्यात क्रोएशियाने पेनल्टी स्ट्रोकवर बाजी मारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पूर्ण वेळेत सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला होता. या स्पर्धेत एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेला हा पहिलाच सामना. एक्स्ट्रा टाईममध्येसुद्धा हा सामना बरोबरीत सुटला. पेनल्टी स्ट्रोकवर मात्र क्रोएशियाने आपला दर्जा दाखवत जपानवर 3-1 अशी मात केली. उपांत्यपूर्व फेरीत आता क्रोएशियाचा सामना बलाढ्य ब्राझीलबरोबर होईल. सामना सुरू होण्याअगोदर सर्वच बाबींचा विचार केला; तर क्रोएशियन संघ जपानपेक्षा नक्कीच वरचढ होता; पण जपानने नियोजनबद्ध खेळ करत त्यांना कडवी टक्कर दिली. सुरुवातीला सामन्यावर नियंत्रण असूनसुद्धा फायनल थर्डमध्ये अनेक संधी वाया गेल्यामुळे क्रोएशिया आघाडी घेऊ शकला नाही. याउलट जपानने पहिला हाफमध्ये मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत एक गोलची आघाडी घेतली. यानंतर दुसर्‍या हाफमध्ये इव्हान पॅरिसिचने उजव्या फ्लँकमधून मिळालेल्या क्रॉसवर जोरदार हेडरद्वारे गोल नोंदवत क्रोएशियाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. क्रोएशियाने पुन्हा एकदा पिछाडीवरून येत आपण सामना जिंकू शकतो, हे सिद्ध केले. मागच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपासून सर्वच सामन्यांत पिछाडीवरून बाजी मारत सामने जिंकले होते. युरोपियन स्टाईल विरुद्ध एशियन स्टाईल, असा रंगलेला हा सामना पूर्णवेळेत बरोबरीत सुटल्यामुळे जादा वेळ देण्यात आला.

या सामन्यात लुका मॉड्रिक चांगला खेळ करण्यात अपयशी ठरला. एक्स्ट्रा टाईममध्ये दोन्ही संघांनी सावध खेळ करण्यावर भर दिला. जपान बचावात्मक खेळ करत पझेशन मिळाल्यानंतर काऊंटर अटॅक करत होता. तर क्रोएशियन बॉलचे नियंत्रण स्वतःकडे राखत दोन्ही फ्लँकमधील जिथून संधी मिळेल त्या बाजूने एरियल क्रॉस देत होते. एक्स्ट्रा टाईममध्ये क्रोएशियाने थकलेल्या खेळाडूंना बदलून त्या ठिकाणी फ्रेश खेळाडू मैदानात उतरले. क्रोएशिया मॉड्रिक, पॅरिसिच यांच्याशिवाय खेळत असल्यामुळे त्यांच्या आक्रमणातील धार थोडीशी कमी झाली होती. शेवटी टायब्रेकरमध्ये सामन्याचा हिरो ठरलेल्या क्रोएशियन गोलकिपरने जपानचे तीन पेनल्टी स्ट्रोक अडवत संघाला विजय मिळवून दिला.

जपान जरी या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेला असला, तरी अनेक फुटबॉल रसिकांची आणि प्रेक्षकांची मने या संघाने जिंकली. या स्पर्धेत जपानने अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध खेळ करत मोठ्या संघांना तगडे आव्हान दिले. मैदानात फक्त आणि फक्त त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळण्यावर जपान संघाने भर दिला. आपल्या संघाच्या नियोजनाप्रमाणे आणि प्रशिक्षकांच्या सूचनेप्रमाणे ते संपूर्ण स्पर्धेत खेळताना दिसले. खेळतानासुद्धा त्यांच्यामध्ये एकप्रकारची शिस्त दिसली. प्रतिस्पर्ध्याबद्दल आणि पंचांच्या निर्णयाप्रति आदर दिसला. खेळाडूच नाही, तर प्रेक्षकांनीसुद्धा सामना संपल्यानंतर स्टेडियमची केलेली सफाई खेळाच्या माध्यमातून सार्‍या विश्वाला एक वेगळा संदेश देऊन जाते.

Back to top button