World Cup 2023 : द. आफ्रिकेसह कोणत्‍या संघांवर ‘पात्रते’ची टांगती तलवार, जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

World Cup 2023 : द. आफ्रिकेसह कोणत्‍या संघांवर 'पात्रते'ची टांगती तलवार, जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पुढील वर्षी म्‍हणजे २०२३ मध्‍ये क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धा भारतात होणार आहे. ५० षटकांच्‍या या
स्‍पर्धेत एकूण १० संघ खेळतील. ( World Cup 2023 ) यातील आठ संघाना आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेच्‍या (आयसीसी ) गुणांनुसार स्‍पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत या स्‍पर्धेसाठी ७ संघ पात्र ठरले आहेत. आता केवळ एका संघाला थेट प्रवेश मिळेल. यासाठी दक्षिण आफ्रिका, वेस्‍ट इंडिज, श्रीलंकासह ६ संघांचे प्रयत्‍न असतील. या सहा संघातील एक संघ स्‍पर्धेत थेट प्रवेश करेल. तर अन्‍य दोन संघांना पात्रता फेरीला सामोरे जावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्‍ट इंडिज, श्रीलंका या बलाढ्य संघाला सर्वात मोठा अडसर हा आर्यलंड संघाचा आहे. जाणून घेवूया क्रिकेट विश्वचषक 2023 मधील संघांच्‍या पात्रतेचा ‘गणिता’विषयी…

World Cup 2023 : अशी आहे थेट पात्रतेची अट

२०२३ मधील क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेचे यजमानपद भारताकडेच असल्‍याने टीम इंडियाला थेट प्रवेश मिळाला आहे. तसेच गुणांच्‍या बाबतीतही टीम इंडिया १६ संघांमध्‍ये सध्‍या अग्रस्‍थानी आहे. यासाठी ‘आयसीसी’ने ३० जुलै २०२२ ते ३१ मे २०२३ पर्यंतच्‍या टॉप १३ संघांमध्‍ये होणार्‍या वन डे मालिकावरुन गुण ठरवले आहेत. जो संघ मालिका जिंकेल त्‍याला १० गूण मिळाले आहेत. पराभूत संघाची पाटी कोरी राहणार आहे. सामना रद्द झाला असेल तर दोन्‍ही संघाला प्रत्‍येकी पाच गुण मिळतील. १३ पैकी पहिल्‍या आठ संघांना स्‍पर्धेत थेट खेळण्‍याची संधी मिळेल. तर उर्वरीत संघांना पात्रता फेरीला सामोरे जावे लागले. या पात्रात फेरीतील आघाडीचे दोन संघांना विश्‍वचषक खेळण्‍याची संधी मिळेल.

आतापर्यंतच्‍या ‘आयसीसी’च्‍या गुणांचा विचार करता इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाच्‍या नावावर एवढे गुण आहेत की, हे संघ टॉप- सातमध्ये राहतील हे निश्चित झाले आहे. याचा अर्थ हे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.

अफगाणिस्तान पात्रता मिळवणारा सातवा संघ ठरला

रविवारी २७ नोव्‍हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वन डे सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे अफगाणिस्तानला ५ गुण मिळाले आणि ११५ गुणांसह ICC सुपर लीग टेबलमध्ये थेट पात्र ठरणारा सातवा संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिका, वेस्‍ट इंडिज आणि श्रीलंकेचा जीव टांगणीला

एकीकडे क्रिकेट विश्वचषक 2023 स्‍पर्धेसाठी बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारख्या संघांनी थेट प्रवेश मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकासारखे दिग्गज संघ मागे पडले आहेत. आयर्लंड, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स या संघांचे भवितव्य अजून स्‍पष्‍ट झालेले नाही. आता या सह संघांपैकी केवळ एकच संघ थेट पात्रतेसाठी पात्र ठरणार आहे. उर्वरित संघांना पात्रता फेरीला सामोरे जावे लागणार आहे.

… तर वेस्ट इंडिज आठव्या क्रमांकावर

सुपर लीगच्या गुणतालिकेत वेस्ट इंडिज ८८ गुणांसह ८व्या क्रमांकावर आहे. त्यांचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. लीगअखेर आठवे स्थान कायम राखल्यास वेस्ट इंडिज विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. मात्र, यासाठी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान तीन सामने गमावावेत, अशी प्रार्थना वेस्‍ट इंडिजाला करावी लागेल. तसेच श्रीलंका आणि आयर्लंडचे संघही 2-2 सामने हरले तरच वेस्ट इंडिजला विश्‍वचषक स्‍पर्धेत थेट प्रवेश मिळेल. अन्यथा या संघाला पात्रता फेरीला सामोरे जावे लागणार आहे.

World Cup 2023 : श्रीलंकेची वाट आहे बिकट

श्रीलंका संघाच्‍या नावावर सध्या केवळ ६७ गुण आहेत. सुपर लीगमध्ये हा संघ १० व्‍या क्रमांकावर आहे. श्रीलंकेला अद्याप अफगाणिस्तानविरुद्ध एक आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने खेळायचे आहेत. चारही सामने जिंकल्यास त्यांचे १०७ गुण होतील. असे असूनही दक्षिण आफ्रिकेने किमान एक सामना गमावला तरच श्रीलंकेला पात्रता मिळू शकेल. 3 सामने जिंकल्यास श्रीलंकेचे 97 गुण होतील. या स्थितीत दक्षिण आफ्रिका संघाचा दोन सामन्‍यांमध्‍ये तर आयर्लंडच्या एका पराभव
व्‍हावा, अशी प्रार्थना या संघाला लागेल.

दक्षिण आफ्रिकेला पुढील सर्व ५ सामने जिंकणे आवश्यक

दक्षिण आफ्रिका केवळ ५९ गुणांसह ११व्या क्रमांकावर आहे. संघाला इंग्लंडविरुद्ध ३ आणि नेदरलँडविरुद्ध २ सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेने सर्व ५ सामने जिंकले तरच या संघाच्‍या नावावर १०९ गुण होतील आणि हा संघ थेट पात्र ठरेल. त्याने 4 सामने जिंकले तर त्याचे 99 गुण होतील. या स्थितीत दक्षिण आफ्रिकेला श्रीलंका संघाचा एक पराभव व्‍हावा, अशी प्रार्थन करावी लागेल. दक्षिण आफ्रिका संघाने 3 सामने जिंकले तर त्याचे 89 गुण होतील. अशा स्थितीत त्यांना श्रीलंकेचे सलग दोन २ पराभव आणि आयर्लंडच्या एका पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पाचपैकी दोन सामने जिंकल्यास 79 गुण आणि एक सामना जिंकल्यास 69 गुण होतील. अशा स्थितीत या संघाला स्‍पर्धेसाठी थेट प्रवेश मिळणार नाही.

World Cup 2023 : आयर्लंडलाही असेल थेट पात्रतेची संधी

21 सामन्यांतून आयर्लंडचे 68 गुण आहेत. या पुढील त्‍यांचे ३ सामने बांगलादेशविरुद्‍ध होतील. हे तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे ९८ गुण होतील. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या उर्वरित किमान दोन सामने गमावले आणि श्रीलंकेचा संघ 1 सामना गमावला तर आयर्लंडचा संघ थेट विश्वचषकात पोहोचू शकतो. दरम्‍यान,सुपर लीगच्या गुणांच्या आधारे झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सला थेट पात्र ठरणे शक्य नाही.

हेही वाचा : 

 

 

Back to top button