पुणे : जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरण मार्गी | पुढारी

पुणे : जुना पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरण मार्गी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनाअभावी सहा वर्षे रखडलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या पुणे- मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करणे, बीआरटी मार्ग विकसित करणे, बोपोडी येथील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी 74 कोटी 75 लाख 89 हजार रुपयांच्या निविदेस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई- पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंपरी हद्दीत दापोडीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु पुणे महापालिका हद्दीत खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये भूसंपादनाअभावी 2.1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नव्हते.

हा रस्ता अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) 42 मीटर रुंदीचा रस्ता अपेक्षित आहे. सध्या हा रस्ता केवळ 21 मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. महापालिकेचे भूसंपादनासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या कामासाठी महापालिकेने 2016 मध्ये याची निविदा काढली होती, पण रस्त्यासाठी जागाच ताब्यात नसल्याने काम होऊ शकले नव्हते. आता सहा वर्षानंतर लष्कराने ही जागा ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबविली. त्यात कृष्णाई इन्फास्टक्चर यांचे सर्वात कमी दराचे म्हणजे 74 कोटी 75 लाख 89 हजार रुपयांची निविदा आली. पूर्वगणनपत्रकापेक्षा ही निविदा 16 टक्के कमी आहे. या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Back to top button