पुणे : तरुणांनो, तुम्ही राजकारणात या; राज ठाकरे यांचे आवाहन | पुढारी

पुणे : तरुणांनो, तुम्ही राजकारणात या; राज ठाकरे यांचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : “आपण सामान्य माणूस नगरसेवक, आमदार, खासदार यांना खूप कमी वेळा भेटतो. सर्वसामान्यांची वैयक्तिक कामे यांच्याकडे फारशी नसतात. मात्र, या राजकीय प्रतिनिधींनी सर्वसामान्यांचे प्रश्न ओळखून कामे केली पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे,” असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

सहकारनगरमध्ये डिसेंबरअखेर झालेल्या सहजीवन व्याख्यानमालेत राज ठाकरे यांचे व्याख्यान झाले होते. त्या वेळी उपस्थित तरुणांना सामाजिक, राजकीय कामे करण्याची इच्छा असल्यास नावे नोंदवावी, असे आवाहन केले होते. त्यामध्ये नोंदणी झालेल्या तरुणांची दखल ठाकरे यांनी घेतली. त्या साठ तरुणांची राज ठाकरे यांनी रविवारी अचानक पुण्यात बैठक घेतली, त्या वेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला.

ठाकरे म्हणाले, “प्रत्येक शहराचे प्रश्न आणि त्याची उत्तरे वेगळी असतात. पुण्यामध्ये मेट्रो सुरू केली आहे. परंतु, पुण्याची एकंदरीत परिस्थिती आणि मानसिकता वेगळी आहे. त्यामुळे पुण्यामध्ये मेट्रो यशस्वी होणार नाही. नाशिकला आम्ही कामे केली. कामे करूनदेखील नंतर आम्हाला यश मिळाले नाही. माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता सोपवा मग बघा कसा विकास होतो.” पक्ष पदाधिकारी बाबू वागस्कर, गणेश सातपुते, योगेश खैरे, अनिल शिदोरे, अजय शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वसंत मोरेंना बसवले शेजारी….
प्रश्न-उत्तरे सुरू असताना समोर बसलेल्या नगरसेवक वसंत मोरे यांना बोलवून शेजारी बसण्यास सांगितले. त्यानंतर एका व्यक्तीने आम्ही कसे राजकारणात यावे, अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना, माझ्या शेजारी बसलेल्या पक्षप्रतिनिधींशी तुम्ही संपर्क साधून राजकारणात येऊ शकता, असे ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button